जालना : गाव परिसरातील रस्त्याचे काम करून देतो, पण आमच्या कामाचे काय? असे म्हणत एका महिला पदाधिकाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी केल्या प्रकरणी हसनाबाद पोलिस ठाण्यात विनयभंग, ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालना : गाव परिसरातील रस्त्याचे काम करून देतो, पण आमच्या कामाचे काय? असे म्हणत एका महिला पदाधिकाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी केल्या प्रकरणी हसनाबाद पोलिस ठाण्यात विनयभंग, ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, भोकरदन तालुक्यातील एका गावातील महिला पदाधिकाऱ्याने त्यांच्या ओळखीच्या असलेल्या जेसीबी मालक गणेश पवार ( रा. देऊळगाव कमान, ता. भोकरदन ) याला मंगळवार, 15 एप्रिल रोजी सायंकाळी साडेचार ते पाच वाजेच्या दरम्यान पाणंद रस्त्याच्या कामाबाबत
फोन करून बोलावून घेतले. यावेळी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जेसीबी मालक गणेश पवार याच्याशी 1200 रुपये तासाप्रमाणे जेसीबी पाठवण्याचे बोलणे झाले. मात्र, गणेश पवार याने संबंधित महिला पदाधिकारी यांच्याकडे तुमचे काम झाले पण आमच्या कामाचे काय, अशी विचारणा केली. यावर तुमचे कोणते काम? असे महिलेने विचारले असता तो म्हणाला, तुम्ही शिकलेल्या आहात, जास्त सांगायची गरज नाही, मी तुमच्याच लोकांमध्ये राहतो, असे म्हणत पवार याने या महिला पदाधिकारी यांच्याकडे शरीर सुखाची मागणी करून जातीचे नाव न घेता जातीवाचक बोलला. पवार याने संबंधित महिलेचे तिला न विचारता चोरून चालतानाचे व्हिडिओ काढून यात महिलेच्या शरिरावरील विशिष्ट ठिकाणी झूम करून चित्रित केले. हे व्हिडीओ या महिलेला दाखवून तिच्याकडे वारंवार शरीर सुखाची मागणी केली. या महिलेने नकार देऊनही सातत्याने अशी मागणी केल्याचे म्हटले आहे.
यानंतर या महिला पदाधिकारी यांनी कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला. यानंतर शुक्रवार, 18 एप्रिल रोजी हसनाबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
याप्रकरणी पोलिसांनी गणेश पवार याच्याविरुद्ध विनयभंग, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी गणपत दराडे हे करीत आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी गणेश पवार हा फरार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. पोलिस त्याच्या शोधात असून आमची टीम काल आणि आजही आरोपीच्या मागावर असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक संजय अहिरे यांनी सांगितले.