छत्रपती संभाजीनगर : मागील तीन-चार वर्षांपासून मराठवाडा सातत्याने अतिवृष्टीचा सामना करीत आहे. यंदा देखील या अतिवृष्टीचा फटका मराठवाड्याला बसला असून जून ते सप्टेंबर या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विभागातील जवळपास 17 लाख हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. त्यामुळे मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश चव्हाण यांनी सोमवार, 22 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आ. सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठवाड्यात मागील आठवडाभरात पावसाने कहर केला असून या आठवडाभरात तब्बल 182 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. परिणामी 4 लाख 91 हजार हेक्टरवरील शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले. अनेक ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने शेत जमीन खरवडून गेली आहे. मराठवाड्यात 15 लाख 97 हजार 238 हेक्टर जिरायत, 3 हजार 861 हेक्टर बागायत, 7 हजार 71 हेक्टरवरील फळपीके बाधित झाली आहेत. याच बरोबर अनेक नागरी भागात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्य, कपडे, विद्युत उपकरणांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मराठवाड्यात खरिपाचे पीक शेतकर्यांच्या हातातून गेले असून सोयाबीन, मुग आदी पिके नामशेष झाली आहेत. तर कपाशी, उस, मका, बाजरीची पिके आडवी झाली आहेत.
शेतकर्यांच्या शेतांमध्ये गुडघाभर पाणी साचले असून आहे ती पिके पिवळी पडत आहेत. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असले तरी अद्यापही अनेक ठिकाणी पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे कधी होणार?, अनेक ठिकाणी पिके वाहून गेल्याने पंचनामे तरी कशाचे करणार? असा प्रश्न शेतकरी वर्गांमधून उपस्थित केला जात आहे. अनेक शेतकर्यांनी कर्ज काढून पिकांची लागवड केली. मात्र अतिवृष्टीमुळे शेतीसाठी लावलेला खर्चही वसूल झाला नसल्याचे आ. सतीश चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले.