Chhatrapati Sambhajinagar Crime: शहराच्या विविध भागात देशी – विदेशी बनावटीचे पिस्टल (रिव्हॉल्वर) घेवून फिरणाऱ्या दोघांना गस्तीवरील गुन्हेशाखा आणि सायबर पोलिसांनी गजाआड केले. दोघांच्या ताब्यातून पोलिसांनी दोन पिस्टल, तीन जिवंत काडतूसे असा एकूण 80 हजार 150 रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला असल्याची माहिती गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त सुभाष भुजंग यांनी रविवार, 27 ऑक्टोबर रोजी दिली.
छत्रपती संभाजीनगर : शहराच्या विविध भागात देशी – विदेशी बनावटीचे पिस्टल (रिव्हॉल्वर) घेवून फिरणाऱ्या दोघांना गस्तीवरील गुन्हेशाखा आणि सायबर पोलिसांनी गजाआड केले. दोघांच्या ताब्यातून पोलिसांनी दोन पिस्टल, तीन जिवंत काडतूसे असा एकूण 80 हजार 150 रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला असल्याची माहिती गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त सुभाष भुजंग यांनी रविवार, 27 ऑक्टोबर रोजी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकी ठकसेन काळे (25), रा. लक्ष्मी गायरान, साईनगर, वाळूज आणि सय्यद जावेद सय्यद मोझम (33), रा.काचीवाडा, शहाबाजार अशी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या पिस्टल घेवून फिरणाऱ्या आरोपींची नावे आहेत. गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत स्वामी, गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त सुभाष भुजंग, गुन्हेशाखेचे निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेचे उपनिरीक्षक विशाल बोडखे, सतीश जाधव, पोलिस अंमलदार विजय निकम, योगेश नवसारे, राजाराम डाखूरे, बाळू नागरे, प्रिती ईलग, ज्ञानेश्वर पवार आदींच्या पथकाने शनिवार, 26 ऑक्टोबर रोजी रात्री विकी ठकसेन काळे याला लक्ष्मी गायरान शिवारातून ताब्यात घेतले. पेालिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ 50 हजार रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस असा 50 हजार 150 रुपये किंमतीचा मुददेमाल मिळून आला.
दुस-या घटनेत, सायबर पोलिस ठाण्याचे पथक छावणी परिसरात गस्तीवर होते. त्यावेळी छावणीतील आठवडी बाजाराजवळ सय्यद जावेद सय्यद मोझम हा संशयास्पद उभा होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळ 25 हजार रुपये किंमतीचे विदेशी बनावटीचे मॅगझिन असलेल पिस्टल आणि 5 हजार रुपये किंमतीचे 9 मिमिचे दोन जिवंत काडतूसे असा 30 हजार रुपये किंमतीचा मुददेमाल मिळून आला. पिस्टल घेवून फिरणाऱ्या दोघांविरुध्द अनुक्रमे वाळूज आणि छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सहाय्यक आयुक्त भुजंग यांनी सांगितले.