Chhatrapati Sambhajinagar Crime News : जुन्या भांडणाच्या कारणावरून सहा जणांनी केलेल्या हल्ल्यामध्ये सुमित काशिनाथ जावळे (२२) राहणार आम्रपाली नगर विद्यापीठ गेट जवळ या तरुणाचा मृत्यू झाला.
छत्रपती संभाजीनगर : जुन्या भांडणाच्या कारणावरून सहा जणांनी केलेल्या हल्ल्यामध्ये सुमित काशिनाथ जावळे (२२) राहणार आम्रपाली नगर विद्यापीठ गेट जवळ या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे बेगमपुरा परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितिक उर्फ छोटू चव्हाण, आदी जयवीर टाक, जीता टाक, ऋषी चव्हाण , जानू चव्हाण, पुनम विजय चव्हाण सर्व राहणार पहाडसिंगपुरा परिसर अशी मारेकऱ्यांची नावे आहेत. मयत सुमित जावळे व मारेकऱ्यांमध्ये काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते . या भांडणाचा राग मनात धरून ऋतिक उर्फ छोटू चव्हाण, आदी टाक, जिता टाक, ऋषी चव्हाण, जानू चव्हाण, आणि पूनम चव्हाण यांनी 14 ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास आम्रपाली नगर येथील ब्लूमिंग बर्ड शाळेजवळ सुमित जावळे याला गाठले. या ठिकाणी सुमित जावळे व हल्लेखोरांमध्ये वाद झाला, वादाचे पर्यावरण हाणामारीत झाल्यावर सहाही जणांनी सुमित जावळे याला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली तसेच आपल्या जवळील धारदार शास्त्राने त्याच्या गळ्यावर आणि पोटावर वार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुमित जावळे याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या घटनेमुळे बेगमपुरा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यावर बेगमपुरा पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. याप्रकरणी मयत सुमित जावळे याचे वडील काशिनाथ सुदाम जावळे (४५) आम्रपाली नगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.