उदयनगर : अमडापूर पोलिसांनी अचानक केलेल्या नाकाबंदीत तब्बल ३ लाख २० हजार २१० रुपयांची रोख रक्कम जप्त करत अमरावती जिल्ह्यातील राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेला चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

उदयनगर : अमडापूर पोलिसांनी अचानक केलेल्या नाकाबंदीत तब्बल ३ लाख २० हजार २१० रुपयांची रोख रक्कम जप्त करत अमरावती जिल्ह्यातील राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेला चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
बुलढाणा जिल्ह्यात वाढत्या चोऱ्यांवर अंकुश लावण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून, याच प्रयत्नांचा भाग म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक तांबे यांच्या आदेशानुसार अप्पर पोलिस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली, अमडापूरचे ठाणेदार निखिल निर्मळ यांनी १८ जून रोजी अमडापूर पोलीस स्टेशन हद्दीतील हरणी फाटा येथे अचानक नाकाबंदी केली. या नाकाबंदीसाठी पीएसआय युवराज राठोड, एएसआय निवृत्ती चेके, पोलीस नायक गजानन काकडे आणि रणजीत सरोदे यांची नेमणुक करण्यात आली होती. नाकाबंदी सुरू असताना एका संशयित मोटरसायकलस्वारावर पोलिसांना संशय आला. त्याला थांबवून चौकशी केली असता, ठाणेदार निर्मळ यांना तातडीने माहिती देण्यात आली. माहिती मिळताच ठाणेदार निर्मळ, हेड कॉन्स्टेबल भगवान शेवाळे आणि विजय पवार यांनी तात्काळ हरणी फाटा येथील नाकाबंदीच्या ठिकाणी धाव घेतली.
संशयित इसम शेख रिजवान शेख उस्मान वय ४०, रा. शिरसगाव कसबा, जि. अमरावती याच्या अंगझडती घेतली असता, त्याच्या पाठीवरील बॅगेतून ३ लाख रुपये रोख, तर पॅन्टच्या खिशातून २० हजार २१० रुपये रोख असे एकूण ३ लाख २० हजार २१० रुपये मिळून आले. याव्यतिरिक्त, त्याच्याकडे ३२ हजार रुपयांची बजाज डिस्कव्हर मोटरसायकल १७ जून रोजी खरेदी केल्याची पावती देखील आढळून आली.
या इसमाविषयी नजीकच्या जिल्ह्यांमध्ये माहिती घेतली असता, धक्कादायक बाब समोर आली. राजापेठ, अमरावती येथील पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात ट्रक मधून साडेतीन लाख रुपये चोरी केल्याचा गुन्हा दाखल असून, राजापेठ पोलिसांची तपास टीम अमडापूरला दाखल झाली आहे. अमडापूर पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल आणि आरोपीला राजापूर पोलीस स्टेशनच्या तपास अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले आहे.