जालना :स्वस्त धान्याचा काळा बाजार जालना जिल्ह्यात सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. परतूर तालुक्यातील वाटूर फाटा येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा 30 टन रेशनचा तांदूळ परतूर येथील महसूल विभागाच्या पथकाने पकडला. या कारवाईत परतूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवार, 30 मार्च रोजी ही कारवाई करण्यात आली.

परतूर तालुक्यातील वाटूर फाटा येथे ही कारवाई करण्यात आली असून या कारवाईमुळे स्वस्त धान्य वितरणातील काळा बाजार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. परतूर येथून एका ट्रकमधून ( एम एच 20, जीसी 2121 ) अवैधरित्या रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेला जात असल्याची माहिती परतूर तहसील कार्यालयाच्या पथकाला मिळाली होती. त्या माहितीवरून तहसील कार्यालयाच्या पथकाने या ट्रकचा पाठलाग करून पिंपरखेडा वाटुर फाट्याजवळ ट्रक थांबवला. यावेळी ट्रक चालक आणि क्लिनरला ट्रकमध्ये काय घेऊन जात असल्याची विचारपूस केली असता त्यांनी गाडीत तांदूळ असल्याचे सांगितले. हा तांदूळ परतूर येथून विजू कुरेशी व युनूस शेख यांनी गाडीमध्ये भरून देऊन गोंदियाकडे घेऊन जाण्यास सांगितल्याचे ट्रक चालक आणि क्लिनरने सांगितले. यावेळी तहसील पथकाने ट्रक चालक आणि क्लिनरकडे तांदूळ खरेदीची पावती, कागदपत्रे मागितली असता त्यांनी कागदपत्रे नसल्याचे सांगितले. त्यामुळे परतूर तहसीलदार यांनी हा ट्रक आणि तांदूळ ताब्यात घेऊन या प्रकरणी पाच जणांविरुद्ध परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ट्रॅक मालक अनिल घुले, ट्रक चालक प्रवीण घुले, ट्रक क्लिनर धनंजय पांजगे, विजू कुरेशी आणि युनूस शेख अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या 5 जणांची नावे आहेत.
काळा बाजार वाढला
जालना जिल्ह्यात यापूर्वी देखील अनेकदा स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ, गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात आल्याची प्रकरणे समोर आलेली आहेत. जालना शहरात रेशनच्या तांदुळाच्या 200 क्विंटल साठ्याचे प्रकरण काही वर्षांपूर्वी चांगलेच गाजले होते. त्यामुळे याकडे जिल्हा पुरवठा विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.