५२ लाखांच्या थकबाकीपोटी भोकरदन पालिकेचे जॅकवेल सील; पाटबंधारे विभागाची पोलीस बंदोबस्तात कारवाई

भोकरदन : ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर भोकरदन शहरावर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले असून, नगर परिषदेच्या ढिसाळ नियोजनाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल ५२ लाख रुपयांची पाणीपट्टी थकीत असल्याने पाटबंधारे विभागाने जुई धरणावरील नगर परिषदेचा ‘जॅकवेल’ पोलीस बंदोबस्तात सील केला.

भोकरदन : ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर भोकरदन शहरावर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले असून, नगर परिषदेच्या ढिसाळ नियोजनाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल ५२ लाख रुपयांची पाणीपट्टी थकीत असल्याने पाटबंधारे विभागाने जुई धरणावरील नगर परिषदेचा ‘जॅकवेल’ पोलीस बंदोबस्तात सील केला. या कारवाईमुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला. अखेर नगरपालिका प्रशासनाने तातडीने २० लाख रुपये भरल्यानंतर हे सील उघडण्यात आले असून, शहराचा पाणीपुरवठा कसाबसा पूर्वपदावर आला आहे.

दानापूर येथील जुई धरणावरून शहराला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून नगर परिषदेने पाटबंधारे विभागाची ५२ लाख रुपयांची थकबाकी भरली नव्हती. वारंवार नोटीस देऊनही दाद न मिळाल्याने, मार्च अखेरच्या वसुलीसाठी पाटबंधारे विभागाने आक्रमक पवित्रा घेतला. शाखा अभियंता पी.आर.सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्तात जॅकवेलला कुलूप ठोकण्यात आले. जॅकवेल सील झाल्याने शहराच्या जलवाहिन्या कोरड्या पडल्या आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली.

जॅकवेल सील होताच पालिकेच्या वर्तुळात मोठी धावपळ उडाली. पाणीपुरवठा खंडित झाल्याने प्रशासनावर चहुबाजूंनी टीका होऊ लागली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नगर परिषदेने तातडीने दोन, तीन टप्यात २० लाख रुपये पाटबंधारे विभागाकडे जमा केले. ही रक्कम भरल्यानंतर विभागाने जॅकवेलचे सील काढले. मात्र, अद्याप ३२ लाख रुपयांची थकबाकी शिल्लक असल्याने, उन्हाळ्याच्या उर्वरित काळात पुन्हा अशीच कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. धरणात पुरेसे पाणी असूनही केवळ प्रशासकीय दिरंगाई आणि थकबाकीमुळे शहरावर पाणीबाणी ओढवली आहे. नियोजनशून्य प्रशासनामुळे गेल्या चार वर्षांपासून प्रशासक असूनही पाणीपट्टी वसुली आणि थकबाकीचा प्रश्न सुटलेला नाही. मालमत्ता कराच्या वसुलीअभावी पालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याचे सांगितले जात आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये ‘मुबलक पाणी’ देण्याचे आश्वासन देणारे प्रतिनिधी आता या गंभीर प्रश्नावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »