Bhendwal Ghatmandani: बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यामधील भेंडवळ येथील प्रसिद्ध भेंडवळ घट मांडणीचे भाकीत 11 मे रोजी जाहीर करण्यात आले. यामध्ये यंदा भरपूर पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात आले असून पिकांची परिस्थिती सुद्धा चांगली राहणार असल्याचे भाकीत जाहीर करण्यात आले आहे. चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी यंदाची भेंडवळची भाकीतं मांडली.
अनुप गवळी/खामगाव : बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यामधील भेंडवळ येथील प्रसिद्ध भेंडवळ घट मांडणीचे भाकीत 11 मे रोजी जाहीर करण्यात आले. यामध्ये यंदा भरपूर पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात आले असून पिकांची परिस्थिती सुद्धा चांगली राहणार असल्याचे भाकीत जाहीर करण्यात आले आहे. चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी यंदाची भेंडवळची भविष्यवाणी जाहीर केली.
साडेतीनशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या भेंडवळ घटमांडणीची भविष्यवाणी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या पर्जन्यमान आणि पिकांच्या स्थितीवर अंदाज वर्तविते. त्यामुळे शेतकरीच नव्हे, आता बी-बियाणे कंपन्याही ‘बिझनेस’साठी येथे गर्दी करतात. वाघकुळातील चंद्रभान महाराज यांनी घटमांडणी व भविष्यवाणीस प्रारंभ केला होता. यामध्ये मुख्यत्वे कृषीविषयक पीके, पर्जन्यमान, देशाचे संरक्षण, अर्थव्यवस्था, व्यापार, आरोग्यविषयक तसेच राजकारण याबाबत संपूर्ण वर्षभराचे भाकीत वर्तविण्यात येते.
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर गावालगतच्या पूर्वेकडील वाघ यांच्या शेतात घटाची मांडणी करून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी घटाचे सूक्ष्म निरीक्षण करून भाकीत वर्तविण्यात येत असते. भेंडवळ येथील घटमांडणीचे भाकीत ऐकून शेतकरी येणाऱ्या खरीप व रब्बी हंगामाचे पेरणी, पाण्याचे नियोजन करतात. अक्षय्य तृतीयेचा मुहूर्तावर गट मांडणी केल्यानंतर आज सूर्योदयापूर्वी वाघ महाराजांनी पीक पाण्याचा अंदाज वर्तविला आहे. मात्र यावर्षी सध्या आचारसंहिता सुरू असल्याकारणाने राजकीय भाकीत या ठिकाणी वर्तवले गेले नाही.
असा आहे यावर्षी पावसाचा अंदाज
या ठिकाणी अंबाडी हे कुलदैवत असून यावर्षी बऱ्यापैकी पाऊस सांगितले आहे. पहिला महिना कमी पाऊस तर बरसणार असून दुसऱ्या महिन्यात सर्वसाधारण पाऊस पडणार आहे. तिसरा महिना जास्त आणि भरपूर पाऊस असणार आहे. चौथ्या महिन्यात अवकाळी पावसासह बऱ्यापैकी पर्जन्यमान सांगितले आहे.
अशी राहील पीक परिस्थिती
यंदा तीळ, गहू, मका पीक जास्त, पण पिकावर रोगराई येणार. कपाशी पिक सर्वसाधारण असल्याच भाकित भेंडवळची घटमांडणी येथे सांगण्यात आले आहे. ज्वारी सर्वसाधारण असल्याचे भाकित सांगण्यात आले. तूर सर्वसाधारण मात्र अनिश्चित उत्पादन असल्याचं सांगण्यात येत आहे. मूग आणि उडीद देखील सर्वसाधारण असेल. यंदा तीळ चांगला असेल. एवढंच नव्हे तर पिकांवर रोगराई असेल बाजरी सर्वसाधारण असेल तर साळीचं चांगल पिक असेल, जवस सर्वसाधारण पिक येईल तर वाटाणा देखील सर्वसाधारण आहे. गहू मात्र यंदा भरपूर प्रमाणात असेल, हरभरा चांगल पिक मात्र भाव निश्चित नाही.
आचारसंहितेमुळे राजकीय भाकीत टाळले
सध्या राज्यसह देशांमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याकारणामुळे पहिल्यांदाच भेंडवळ घटमांडणी मध्ये राजकीय भाकिते वर्तविण्यात आली नाही. भेंडवळ घट मांडणी दरम्यान आचारसंहितेचे सुद्धा पालन करण्यात आले.