वाशिम : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांना चुकीची केवायसी झाल्याच्या कारणास्तव वगळण्यात आले आहे. पुन्हा केवायसी करतानाही अनेक महिलांना अडचणी येत असल्याने तसेच नव्याने पात्र ठरलेल्या महिलांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी सोमवारी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत निवेदन सादर केले.

काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज अभियानाचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे पाटील यांच्या नेतृत्वात महिलांच्या शिष्टमंडळाने अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, योजनेत अनेक महिलांना चुकीची केवायसी झाल्यामुळे लाभापासून वंचित राहावे लागले आहे. काही महिलांनी केवायसीतील त्रुटी दुरुस्त करून प्रक्रिया पूर्ण केली असली तरी त्यांना मागील दोन महिन्यांचे हप्ते अद्याप मिळालेले नाहीत. तसेच आता अनेक महिलांचे वय २१ वर्षे पूर्ण झाल्यामुळे त्या योजनेसाठी पात्र ठरत आहेत. मात्र नव्याने अर्ज करण्यासाठी संधी उपलब्ध नसल्याने या महिलांनाही लाभ मिळत नाही. याशिवाय काही महिलांना वेळेत केवायसी करता आली नसल्याने त्या देखील योजनेपासून वंचित राहिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नव्याने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करावी, केवायसीसाठी पुन्हा संधी द्यावी तसेच केवायसी पूर्ण केलेल्या महिलांना मागील दोन महिन्यांचे थकित हप्ते आगामी हप्त्याबरोबरच वर्ग करावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.