जालना : शेतकऱ्यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या आपत्ती अनुदान निधीतील मोठ्या गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. दरम्यान, यातील 18 आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज शुक्रवार, 12 सप्टेंबर रोजी अंबड येथील सत्र न्यायालयाने फेटाळून लावले.

जालना : शेतकऱ्यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या आपत्ती अनुदान निधीतील मोठ्या गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. दरम्यान, यातील 18 आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज शुक्रवार, 12 सप्टेंबर रोजी अंबड येथील सत्र न्यायालयाने फेटाळून लावले.
जालना जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीच्या अनुदानावर डल्ला मारणाऱ्या महसूल, कृषी आणि जिल्हा परिषदेच्या ग्रामसेवकांनी कोट्यवधीचा घोटाळा केल्याचे उघडकीस आल्यानंतर 21 जणांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर यातील 28 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आलेला आहे. दरम्यान, गुन्हे दाखल करण्यात आलेल्या आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज केले होते. मात्र शुक्रवारी न्यायालयाने हे अर्ज फेटाळून लावले. आरोपींच्या अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात जिल्हा सरकारी वकील बाबासाहेब इंगळे यांनी सरकार पक्षाच्या वतीने भक्कम मांडणी केली.
या प्रकरणातील आरोपी सुशिलकुमार दिनकर जाधव यास 11 सप्टेंबर रोजी बुलढाण्यातून अटक करण्यात आली. त्यास अंबड न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची १८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कस्टडी मंजूर केली आहे. उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू असून, पथके रवाना करण्यात आली आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे उपअधीक्षक सिद्धार्थ माने, सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्यासह गोकुळसिंग कायटे, समाधान तेलंग्रे, किरण चव्हाण, अंबादास साबळे, गजानन भोसले, विष्णु कोरडे, ज्ञानेश्वर खुने, रविंद्र गायकवाड, श्रेयश वाघमारे, महिला अंमलदार जयश्री निकम, निमा घनघाव, मंदा नाटकर यांनी केली.
