Akola Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीत अकोला जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढती होत असल्याचे चित्र आहे. यामध्ये जातीय समीकरण कळीचा मुद्दा ठरेल. विविध समाजाच्या मतांचे गणित जुळवण्यासाठी उमेदवारांची धडपड सुरू आहे. निवडणुकीमध्ये जातीय समीकरणच निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.
अकोला : विधानसभा निवडणुकीत अकोला जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढती होत असल्याचे चित्र आहे. यामध्ये जातीय समीकरण कळीचा मुद्दा ठरेल. विविध समाजाच्या मतांचे गणित जुळवण्यासाठी उमेदवारांची धडपड सुरू आहे. निवडणुकीमध्ये जातीय समीकरणच निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.
अकोला जिल्ह्यातील प्रत्येक निवडणुकीत जातीय समीकरणच प्रभावी ठरल्याचा प्रत्यय वारंवार येतो. अकोला पूर्व मतदारसंघात भाजपचे रणधीर सावरकर मराठा, शिवसेना ठाकरे गटाचे गोपाल दातकर कुणबी, तर वंचित आघाडीचे ज्ञानेश्वर सुलताने धनगर समाजातून येतात. या तिन्ही समाजाची मोठी मतपेढी मतदारसंघात आहे. याशिवाय माळी, कोळी, हिंदी भाषिक, दलित, मुस्लीम आदींसह विविध समाजाचे देखील बहुसंख्य मतदार आहेत. संबंधित उमेदवारांचा आपल्या जातीच्या मतांवर प्रथम दावा आहे. मात्र, जाती अंतर्गत मतभेद व पक्षीय बांधिलकीतून मतांची फाटाफूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अकोला पूर्वमध्ये तिरंगी लढत होत आहे. अकोला पश्चिम मतदारसंघात अग्रवाल समाजातून भाजपचे विजय अग्रवाल, काँग्रेसचे साजिद खान पठान मुस्लीम, भाजपचे बंडखोर हरीश आलिमचंदानी सिंधी, प्रहारचे डॉ. अशोक ओळंबे मराठा पाटील, तर शिवसेना ठाकरे गटाचे राजेश मिश्रा हिंदी ब्राह्मण समाजातून येतात. अकोला पश्चिममध्ये भाजपतील बंडखोरीमुळे हिंदू मतांमध्ये मोठ्या प्रमाणात विभाजन होईल. ते टाळण्याचे लक्ष्य भाजपपुढे राहील. मतविभाजनावरच येथील समीकरण अवलंबून राहणार आहे.
बाळापूर मतदारसंघात उमेदवारांना मत विभाजनाची चिंता
बाळापूर मतदारसंघात जातीनिहाय मतांचे विभाजन होण्याची दाट शक्यता आहे. देशमुख समाजातून शिवसेना ठाकरे गटाचे नितीन टाले, मुस्लीमांमधून वंचितचे नातिकोद्दिन खतीब, तर शिवसेना शिंदे गटाचे बळीराम सिरस्कार माळी समाजातून येतात. मतदारसंघात प्रमुख तिन्ही उमेदवारांचे गठ्ठा मतदान आहे. हे लक्षात घेऊन पक्षांनी त्यांना निवडणूक रिंगणात उतरवले. राष्ट्रवादीचे कृष्णा अंधारे यांनी बंडखोरी केली असून ते अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. त्यामुळे मराठा मतांची देखील विभागणी होऊ शकते.