जालना : जशी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, तसेच जालना हे शहर मराठवाड्याची आर्थिक राजधानी आहे. ही मोठी व्यापारी पेठ आहे, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी येथे केले.

जालना : जशी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, तसेच जालना हे शहर मराठवाड्याची आर्थिक राजधानी आहे. ही मोठी व्यापारी पेठ आहे, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी येथे केले.
जालना शहर महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या 65 उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी जालना शहरात विजय संकल्प सभा घेतली. त्यावेळी दानवे बोलत होते. ते पुढे म्हणाले,
नगरपालिका अस्तित्वात आल्यापासून जालना शहर एकदाही भाजपच्या ताब्यात आलेले नाही. सतत काँग्रेस, कधी शिवसेना तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता पालिकेवर राहिलेली आहे. मात्र, खऱ्या अर्थाने केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर जालना शहराच्या आणि जिल्ह्याच्या विकासाला गती आली. एकेकाळी जालना जिल्ह्याची लातूर सोबत तुलना केली जायची की लातूर पुढे गेले आणि जालना मागे. पण, 2014 नंतर आपण तो सगळा बॅकलॉग भरून काढला आहे. जालना शहराच्या चहूबाजूंनी राष्ट्रीय महामार्गाचे जाळे सशक्त केले. सिमेंट रस्ते आपण केले. यासह जालना शहरात ड्रायपोर्ट, समृध्दी महामार्ग, आयसीटी कॉलेज, मेडिकल कॉलेज यासारख्या संस्था सुरू केल्या, असे यावेळी दानवे यांनी सांगितले. यावेळी आमदार बबनराव लोणीकर, भास्कर दानवे यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
जालन्यात क्रीडा विद्यापीठ द्या
छत्रपती संभाजीनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे, परभणी येथे कृषी विद्यापीठ आहे. नांदेड येथे विद्यापीठ आहे. आमच्या जालन्यातही एक विद्यापीठ पाहिजे. आमच्याकडे खेळाडू खूप आहेत. त्यामुळे येथे एक क्रीडा विद्यापीठ उभारावे, अशी मागणी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
‘नळ उघडताच स्वच्छ पाणी’ हे स्वप्न : फडणवीस
अमृत योजनेतून १२५ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून ४७४ किलोमीटर जलवाहिनी टाकण्यात आली आहे. नऊपैकी आठ जलकुंभ पूर्ण झाले असून उर्वरित कामे तीन महिन्यांत पूर्ण होतील. येत्या काळात जालन्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पूर्णपणे सुटेल. ज्या ज्या वेळी नळ उघडेल त्या त्या वेळी पिण्याचे स्वच्छ पाणी आले पाहिजे, असे आमचे स्वप्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
