मनरेगातून किन्हीराजा आदर्श गाव घडवण्याचा निर्धार: व्यापक शिवार फेरीतून जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला विकासकामांचा आढावा

वाशिम : मनरेगा अंतर्गत दत्तकग्राम असलेल्या किन्हीराजाचा केवळ रोजगारनिर्मितीपुरता नव्हे, तर जलसंधारण, पर्यावरण संवर्धन, पर्यटन विकास आणि स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण करणारा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी व्यक्त केला. यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून नियोजनबद्ध व दीर्घकालीन विकास आराखडा तयार करावा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

दत्तकग्राम प्रकल्पाअंतर्गत मनरेगामधून राबविण्यात येणाऱ्या प्रस्तावित विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी १ जानेवारी रोजी व्यापक शिवार फेरी केली. यावेळी गावातील मोठा तलाव, पौराणिक महत्त्व असलेला छोटा तलाव, काटेपूर्णा अभयारण्य परिसर, सोनल धरणालगतची ई-क्लास जमीन तसेच समृद्धी महामार्ग इंटरचेंज परिसराची पाहणी करून उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर कसा करता येईल, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.  फेरीदरम्यान पर्यटन व रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने जंगल सफारी, फळबाग लागवड, रेशीम उद्योग, शेततळे निर्मिती, बांबुवन विकास, तलावांचे सौंदर्यीकरण तसेच समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी माहिती फलक व दिशादर्शक सुविधा उभारण्याच्या संकल्पना मांडण्यात आल्या. या उपक्रमांमुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन गावाच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.  किन्हीराजाला आदर्श दत्तकगाव म्हणून विकसित करण्यासाठी एकात्मिक आणि दूरदृष्टीपूर्ण नियोजन आवश्यक असल्याचे अधोरेखित करत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागांनी प्रारूप विकास आराखडा लवकर सादर करण्याचे निर्देश दिले. मनरेगातून राबविण्यात येणाऱ्या कामांमुळे जलसंधारण, पर्यावरण संरक्षण, पर्यटन विकास आणि रोजगारनिर्मिती ही उद्दिष्टे एकाच वेळी साध्य होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.  या शिवार फेरीत मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस, भाप्रसे परिविक्षाधीन अधिकारी व गटविकास अधिकारी आकाश वर्मा, तहसीलदार दीपक पुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोंद्रे, सहाय्यक गटविकास अधिकारी रमेश कंकाळ, राज्य प्रशिक्षण समन्वयक निलेश घुगे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »