मलकापूर शहरात दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात आरोपी आरिफ खानवर एमपीडीए अंतर्गत कारवाई

मलकापूर : मलकापूर शहरात सातत्याने दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात आरोपी आरिफ खान उर्फ खेबड्या कौसर खान याच्यावर अखेर महाराष्ट्र झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे. मलकापूर शहर पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली असून आरोपीला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

मलकापूर : मलकापूर शहरात सातत्याने दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात आरोपी आरिफ खान उर्फ खेबड्या कौसर खान याच्यावर अखेर महाराष्ट्र झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे. मलकापूर शहर पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली असून आरोपीला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

आरिफ खान (वय २४, रा. मालवीपुरा, मलकापूर) हा गेल्या २०२३ पासून गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असून त्याच्यावर मलकापूर शहर पोलीस ठाण्यात मारहाण, जीवघेणा हल्ला, शस्त्रांचा वापर, दहशत निर्माण करणे, सार्वजनिक शांततेचा भंग अशा गंभीर स्वरूपाचे एकूण ८ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिक उघडपणे तक्रार देण्यासही घाबरत असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली होती.

यापूर्वी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असतानाही त्याच्या वर्तनात कोणताही सुधार झाला नाही. त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करणे आवश्यक असल्याचा अहवाल मलकापूर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पो. नि. गणेश गिरी यांनी सादर केला.

हा प्रस्ताव गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख स.पो. नि दीपक वारे यांच्या सूचनेनुसार तयार करून पोलीस अधीक्षक निलेश तांबे (बुलढाणा) यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी प्रस्तावाचे अवलोकन करून तो मंजूर केला आणि आरोपी आरिफ खान याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये पो. नि. गणेश गिरी, स.पो.नि. दीपक वारे, पोलीस अंमलदार आसिफ शेख (311), योगेश तायडे (2654), संतोष कुमावत (1013), प्रविण गवई (2732), नवल राठोड (1346) व आनंद माने (1254) यांनी सहभाग घेतला. या कठोर कारवाईमुळे मलकापूर शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »