25 लाखांची सुपारी घेऊन केला तरुणाचा खून : सागर धानुरे खून प्रकरण उघडकीस ;  दोघांची पोलिस कोठडीत रवानगी

जालना :  जालना शहरातील कलावती हॉस्पिटलसमोर रविवार, 21 डिसेंबर रोजी कारमध्ये मृतावस्थेत आढळलेल्या सागर धानुरे या तरुणाचा मृत्यू आत्महत्या नसून तो सुपारी देऊन करण्यात आलेला खून असल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात २५ लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत दोन्ही आरोपींना जेरबंद करत गुन्हा उघडकीस आणला आहे.

जालना :  जालना शहरातील कलावती हॉस्पिटलसमोर रविवार, 21 डिसेंबर रोजी कारमध्ये मृतावस्थेत आढळलेल्या सागर धानुरे या तरुणाचा मृत्यू आत्महत्या नसून तो सुपारी देऊन करण्यात आलेला खून असल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात २५ लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत दोन्ही आरोपींना जेरबंद करत गुन्हा उघडकीस आणला आहे.

रविवार, २१ डिसेंबर  रोजी कदीम जालना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू दाखल असलेल्या प्रकरणात तपासादरम्यान सागर धानुरे याची आत्महत्या नसून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. 

पैशांच्या वादातून कट

तपासात असे निष्पन्न झाले की, आरोपी कल्याण गणपतराव भोजने ( वय ४१, रा. समर्थ नगर, जुना जालना ) याचे व मयत सागर धानुरे याचे पैशांच्या देवाण-घेवाणीवरून वाद होते. सागर धानुरे सतत पैशासाठी तगादा लावत असल्याने आरोपी कल्याण भोजने त्रस्त होता. याचदरम्यान, सागर धानुरे व कमलेश झाडीवाले यांच्यातही वाद असल्याची माहिती समोर आली.

यातूनच कल्याण भोजने याने कमलेश झाडीवाले याला २५ लाख रुपये देऊन सागर धानुरे याचा खून करण्याची सुपारी दिली. दोघांनी मिळून सुमारे १५ दिवसांपूर्वी खुनाचा कट रचला.

गोळीबार व चाकूने वार

  शनिवार, २० डिसेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास आरोपी कल्याण भोजने याने सागर धानुरे याला कलावती हॉस्पिटलसमोर बोलावून घेतले. त्यानुसार आरोपी कमलेश झाडीवाले तेथे गेला व सागर धानुरेच्या कारमध्ये शेजारी बसून त्याच्याशी बोलण्यात गुंतवून ठेवले.

यानंतर आरोपी कमलेश झाडीवाले याने सोबत आणलेल्या गावठी पिस्तुलातून दोन राऊंड सागर धानुरेच्या गळ्याजवळ फायर केले. सागर धानुरेने प्रतिकार करत आरोपीला पकडल्याने आरोपीने चाकूने छाती व गळ्याजवळ वार करून मृत्यूची खात्री केली आणि घटनास्थळावरून फरार झाला.

आरोपीचा धक्कादायक बनाव

घटनेनंतर दुसऱ्या दिवशी आरोपी कमलेश झाडीवाले हा सागर धानुरेच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यासाठी मित्रांसोबत छत्रपती संभाजीनगर येथे गेला. जेणेकरून संशय येऊ नये.

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांच्या आधारे तपास करत नागेवाडी टोलनाक्याजवळ आरोपी कमलेश झाडीवाले याला अटक केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत, खून केल्यानंतर २५ लाख रुपये मिळणार असल्याचे सांगितले.

पोलीस कोठडीत रवानगी

या प्रकरणातील दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी कदीम जालना पोलीस ठाण्याच्या तपासी अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

यांनी केली कारवाई 

ही संपूर्ण कारवाई

पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल,

अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी,

उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव,

सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे,

पोउपनि. राजेंद्र वाघ

तसेच अंमलदार रामप्रसाद पव्हरे, भाऊराव गायके, सॅम्युअल कांबळे, रमेश राठोड, प्रभाकर वाघ, सागर बाविस्कर, इरशाद पटेल, संदीप चिंचोले, रमेश काळे व संजय सोनवणे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »