रिसोड : नगरपरिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून, अत्यंत अटीतटीच्या व प्रतिष्ठेच्या लढतीत महायुतीचे उमेदवार भगवान क्षीरसागर यांनी नगराध्यक्षपदावर दणदणीत विजय मिळवला आहे.

रिसोड : नगरपरिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून, अत्यंत अटीतटीच्या व प्रतिष्ठेच्या लढतीत महायुतीचे उमेदवार भगवान क्षीरसागर यांनी नगराध्यक्षपदावर दणदणीत विजय मिळवला आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असलेल्या क्षीरसागर यांनी शिवसेना (उबाठा)चे उमेदवार सुधाकर देशमुख यांचा ९८२ मतांनी पराभव केला.
अंतिम निकालानुसार भगवानराव क्षीरसागर यांना ९,८८१ मते मिळाली, तर सुधाकर देशमुख यांना ८,९६८ मते मिळाली. या फरकामुळे महायुतीने रिसोड नगरपरिषदेवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. नगरसेवक पदाच्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने बऱ्यापैकी बाजी मारली असली, तरी महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांना नगरसेवक पदाच्या एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) लाही या निवडणुकीत खाते उघडता आले नाही. अत्यंत प्रतिष्ठेची ठरलेली ही निवडणूक संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेत होती. माजी खासदार अनंतराव देशमुख आणि आमदार भावना गवळी यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती, तर काँग्रेसचे आमदार अमित झनक यांच्यासाठी अस्तित्व टिकवण्याच्या दृष्टीने ही निवडणूक तितकीच महत्त्वाची होती. माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी पुन्हा एकदा रिसोड नगरपरिषदेवर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.
