लग्न विधी खराखुरा, पण नवरी व मामा बनावट; रिसोड पोलिसांनी टोळी पकडली 

वाशिम : लग्नाचा बनाव करून तब्बल 1 लाख ८० हजार ७०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश रिसोड पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत

वाशिम : लग्नाचा बनाव करून तब्बल 1 लाख ८० हजार ७०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश रिसोड पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

फिर्यादी अजय नारायण भैराने ( रा. गांजरे गल्ली, रिसोड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १२ जुलै २०२५  रोजी त्यांच्या मामाने मेहकर-रिसोड प्रवासादरम्यान  सोयरीक दाखविण्याच्या बहाण्याने आरोपी महिलांनी संपर्क ठेवला. त्यानंतर २१ जुलै रोजी  रिसोड येथील सातारकर महाराज संस्थान येथे लग्न लावून देण्यात आले. लग्नविधी पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने पार पडला असून, त्यात फिर्यादीकडील अनेक नातेवाईक उपस्थित होते.

फिर्यादीकडून लग्नाच्या मोबदल्यात १,२५,००० रुपये नगदी, ४४,२०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि ११,५०० रुपये किमतीचे कपडे असा एकूण १,८०,७०० रुपयांचा ऐवज घेण्यात आला. लग्नानंतर नवरी व तिची “बहीण” बनलेली महिला फिर्यादीच्या घरी आल्या. मात्र, मध्यरात्री घरातील सर्व सदस्य झोपेत असताना त्यांनी दागिने व रोख रक्कम घेऊन पलायन केले. फिर्यादीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास पथक नेमून सखोल तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपींची खरी नावे उघड झाली. यामध्ये शारदा भागाजी तनपुरे (वय ३५, रा. टिटवी, ता. लोणार,), मनिषा सचिन आठवे (वय २८, रा. विद्यानगर, परभणी), पुजा कचरुलाल लिपत्रेवार (वय ४०, रा. मानवत, जि. परभणी) आणि लग्नात नवरीचा मामा बनलेला श्रीरंग शाहुराव हिवाळे (वय ५४, रा. मंठा, जि. जालना) यांना अटक करण्यात आली.

आरोपींकडून ४३,८०० रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून, या टोळीने बीड, जालना, परभणी आणि मध्यप्रदेशातही अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही टोळी आंतरराज्यीय स्वरूपाची असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सपोनि संतोष आघाव, मिना पाथरकर, पोलीस जमादार शारदा आखाडे, कॉन्स्टेबल रवि इरतकर, बेले, महिला कर्मचारी सुषमा गायकवाड व कांचन डोंगरदिवे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »