वाशिम : राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खरिप हंगामात मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक अहवालानुसार तब्बल २० लाख १२ हजार ७७५ एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला असून, यापैकी ११ जिल्ह्यांमध्ये १० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी २० ऑगस्ट रोजी वाशिम येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

त्यांनी सांगितले की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही. प्रशासनाला पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल शासनाकडे पाठविण्याचे आदेश दिले आहेत. अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडले असले तरी शासन त्यांच्यापाठीशी खंबीरपणे उभे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, ८ लाख ५ हजार ११० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. तब्बल १८७ तालुके आणि ६५४ महसूल मंडळांमध्ये पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामध्ये सर्वाधिक फटका नांदेड आणि वाशीम जिल्ह्यांना बसला आहे. अतिवृष्टीमुळे वाशीम जिल्ह्यातील तब्बल ३५० गावांवर परिणाम झाला आहे. ४ लाख ११ हजार ३९२ एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नांदेड जिल्ह्यात २ लाख ८५ हजार ५४३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान नोंदवले गेले आहे. याशिवाय यवतमाळ, बुलढाणा, अकोला, सोलापूर आणि हिंगोली जिल्ह्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे.
सर्वाधिक नुकसान झालेले जिल्हे (प्राथमिक अंदाज)
वाशिम– ४,११,३९२ एकर
नांदेड – २,८५,५४३ हेक्टर
यवतमाळ – ८०,९६९ हेक्टर
बुलढाणा – ७४,४०५ हेक्टर
अकोला – ४३,७०३ हेक्टर
सोलापूर – ४१,४७२ हेक्टर
हिंगोली – ४०,००० हेक्टर