वाशिम : नगर परिषद अंतर्गत घंटागाडी व ट्रॅक्टरद्वारे कचरा संकलन करणारे जवळपास ९० कंत्राटी सफाई कामगार व वाहनचालकांना, कंत्राटदार बदलल्याने कामावरून काढण्यात आले आहे. त्यामुळे हे कामगार व त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह संकटात सापडला असून, ११ ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.

गेल्या १० ते १२ वर्षांपासून नगर परिषदेच्या विविध वाहनांद्वारे शहरातील कचरा संकलनाचे काम हेच कामगार करत होते. मात्र, २५ जुलै रोजी नवीन टेंडरनंतर नव्या कंत्राटदाराने जुन्या, अनुभवी कामगारांना कामावरून कमी करून नव्या कामगारांची नियुक्ती केली. यामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. कामगारांनी यापूर्वी किमान वेतन मिळावे, अशी मागणी केली होती. मात्र, नगर परिषद प्रशासनाने नकार दिल्यानंतरही हे कामगार जुन्याच वेतनावर काम करण्यास तयार होते, असा संघटनेचा दावा आहे. कोरोनाकाळात स्वतःचा जीव धोक्यात घालून सेवा दिलेल्या या कामगारांकडे आता प्रशासनाने पाठ फिरवली असल्याची भावना त्यांच्यात आहे. या अन्यायाविरुद्ध कामगारांनी नगर परिषद प्रशासन व कंत्राटदारांना वारंवार भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र मुख्याधिकारी, आरोग्य निरीक्षक किंवा संबंधितांनी प्रतिसाद दिला नाही. परिणामी, उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
कामगारांना तात्काळ पुन्हा कामावर घ्यावे.
जुन्या कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे आणि त्यांच्या कुटुंबाला उपासमारीपासून वाचवावे, यासाठी घंटागाडी व ट्रॅक्टर सफाई कामगार संघटनेने अर्धनग्न साखळी उपोषण सुरु केले आहे. उपोषणात अर्जुन नेमाडे, अमर चौधरी, संतोष काळे, राहुल ठोके, रवि पठाडे, मनोज घाटे, गणेश इंगोले, योगेश आपटे, गणेश मोरे, अल्ताब चौधरी, सुधीर बोरकर, माधव कुचेकर, जयदीप ढोके, कृष्णा नेमाडे, शे. सलीम गुलाब, विला ढेले, राजु खंदारे, रामा भोंगळ, आकाश इंगोले, योगेश देवरे, संजय चव्हाण, अमोल समुद्रे, केदारनाथ रणखांब, भिमा गिर्हे, दिपक खंदारे, विजय गवळी, लखन गवळी, रामेश्वर सुतारे आदी सफाई कामगार सहभागी झाले आहेत.