वाशिम : वाशिम जिल्हा पोलिसांनी फक्त तीन तासांत चार गंभीर जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल करत दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून ५ मोबाईल व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक लता फड आणि सहायक पोलिस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

८ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेच्या दरम्यान वाशिम शहर व ग्रामीण हद्दीत एकूण चार ठिकाणी तीन आरोपींनी यामाहा R-१५ रेसर बाईकवर येऊन चाकूचा धाक दाखवून नागरिकांकडून मोबाईल व पैसे लुटले. प्रत्येक फिर्यादीने आरोपींचे एकसारखेच वर्णन दिल्याने पोलिसांनी तातडीने वेगवेगळ्या पथकांची नियुक्ती केली. सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अकोला जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. वाशिम ग्रामीणचे ठाणेदार सपोनि श्रीदेवी पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि योगेश धोत्रे, पोउपनि मास्कर, वाशिम शहरचे सपोनि वाळासाहेब नाईक आणि त्यांची टीम, बार्शिटाकळी ठाण्याचे पोनि धुमाळ यांच्या पथकांसह सुकळी पैसाळी गावात छापा टाकला. गावातील एका घरास वेढा घालून पोलिसांनी आत प्रवेश केला असता, एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. मात्र, राजू तुळशीराम कांबळे (रा. पंचशील नगर, वाशिम), प्रसिक युवराज जाधव (रा. सुकळी पैसाळी, ता. बार्शिटाकळी, जि. अकोला) या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत आरोपींनी सर्व चारही गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून जबरी चोरी गेलेले ५ मोबाईल फोन व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.