Vidhan Sabha election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून गुरूवारी विधानसभा निवडणुकीच्या उपमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. एकूण ४५ उमेदवारांमध्ये मराठवाड्यातील दहा जणांचा समावेश आहे.
छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून गुरूवारी विधानसभा निवडणुकीच्या उपमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. एकूण ४५ उमेदवारांमध्ये मराठवाड्यातील दहा जणांचा समावेश आहे. यामध्ये घनसावंगी मधून माजी मंत्री रोश टोपे, तर बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांना संधी देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर मतदारसंघातून आ. सतीश चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे, मात्र या यादीत जिल्ह्यातील एकाही उमेदवारांच्या नावाचा समावेश नाही.
दोन्ही शिवसेनेसह भाजपाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर गुरूवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी समोर आली. या यादीत मराठवाड्यातील एकूण दहा उमेदवारासह राज्यातील ४५ जणांचा समावेश आहे. जालना जिल्ह्यातील घनसावंगी मधून शरदचंद्र पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री राजेश टोपे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर याच जिल्ह्यातील बदनापूरमधून राष्ट्रवादीने जुने कार्यकर्ते बबलू चौधरी यांना संधी दिली आहे.
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव आ. संतोष दानवे यांच्या भोकरदन मतदारसंघातून राष्ट्रवादीने माजी आ. चंद्रकांत दानवे यांना समोर केले आहे. परभणी जिल्ह्यातील वसमत मधून जयप्रकाश दांडेगांवकर लढणार आहेत तर जिंतुरमध्ये विजय भांबळे भाजपाच्या विद्यमान आमदार मेघना बोर्डिकर यांना टक्कर देणार आहेत. बीड मधील आष्टी मतदारसंघातून राष्ट्रवादीने पहिल्यांदा तरूण चेहरा देत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांना उमेदवारी दिली आहे. तर केज येथील अनुसूचित जाती आरक्षीत मतदासंघात भाजपाच्या विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांच्या विरोधात पुन्हा एकदा माजी आमदार पृथ्वीराज साठे मैदानात आहेत. नांदेड जिल्ह्यातील किनवट मध्ये प्रदिप नाईक, लातूर मधील अहमदपूरमध्ये विनायक पाटील आणि उदगीरमधून सुधाकर भालेराव राष्ट्रवादीकडून खिंड लढवणार
आहेत.
या जिल्ह्याला दुसऱ्या यादीची प्रतीक्षा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पहिल्या यादीत मराठवाड्यातील जालना – ३, परभणी – २, बीड – २, लातूर – २ तर नांदेड मध्ये १ अशा एकूण दहा मतदारसंघात उमेदवार जाहीर केले आहेत. छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातील एकाही उमेदवाराच्या नावाची घोषणा मात्र या पहिल्या यादीत नाही. त्यामुळे या तीन जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या ईच्छुक उमेदवारांना दुसऱ्या यादीची
प्रतीक्षा आहे.