Sindkhedaraja Vidhan Sabha Constituency: डॉ.राजेंद्र शिंगणे यांची घरवापसी राजकारण पालटणारी!

Sindkhedaraja Vidhan Sabha Constituency

Sindkhedaraja Vidhan Sabha Constituency: डॉ.राजेंद्र शिंगणे यांची घरवापसी सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील राजकारणाचा मोड बदलवणारी आहे. या घरवापसीचे पडसाद जिल्ह्यातील इतर मतदारसंघावरही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Sindkhedaraja Vidhan Sabha Constituency
दिपक नागरे/ सिंदखेडराजा : डॉ. राजेंद्र शिंगणे हे अजित पवार गटाकडे असल्याने विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे इच्छुकांची गर्दी झाली होती. नव्हेतर उमेदवारी आपल्यालाच असा सूरही काढल्या जात होता. त्यातल्या त्यात उमेदवारांच्या मुलाखती सुध्दा आटोपल्या होत्या. एवढं सगळं होऊनही निवडणूकीच्या अगदी तोंडावर शरद पवार यांनी डॉ. शिंगणे यांना पक्षात प्रवेश देत त्यांची उमेदवारी बळकट केली आहे. डॉ.राजेंद्र शिंगणे यांची घरवापसी सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील राजकारणाचा मोड बदलवणारी आहे. या घरवापसीचे पडसाद जिल्ह्यातील इतर मतदारसंघावरही होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या मागील कारणमीमांसा जाणून घेतली तर शरद पवार व आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांची ही ठरलेली खेळी असल्याचे बोलल्या जात आहे. कारण ज्यावेळी अजितदादा बंडखोरी करीत सत्तेत सहभागी झाले. डॉ. शिंगणे हे त्यावेळी विदेशात होते. तेथून परतल्यावर त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन आपण त्यांच्याच गटात राहणार असे सुतोवाच केले होते. मात्र अजित पवारांनी जिल्हा सहकारी बँकेला निधी देऊ केला. त्यामुळे सर्वसामान्य व शेतकऱ्यांचा फायदा होत असल्याने आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे हे अजित पवार गटात समाविष्ट होऊन सत्तेतील महायुतीत सहभागी झाले. सत्तेत सहभागाच्या घडामोडी सुरु असताना सुध्दा त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. परंतु ज्यावेळीही शरद पवारांवर व्यक्त होण्याचा प्रसंग आला, त्यावेळी डॉ. शिंगणे यांच्या तोंडून शरद पवार यांचा आदरच व्यक्त होत होता. त्यात वर्धा येथील एका कार्यक्रमातील त्यांचे वक्तव्य राज्यभर गाजले होते. यासर्व बाबीतून डॉ. शिंगणे शरद पवारांच्या विरोधात असले तरी त्यांनी आपला स्नेहबंध जोपासल्याचेच दिसून आले.

शरद पवारांसोबतचा संपर्क कायम

सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी अनेक इच्छुक असले व त्यांच्या मुलाखतीही आटोपल्या असल्या तरी शरद पवार त्याबाबत समाधानी नसावेत, असा राजकीय होरा डॉ. शिंगणे यांच्या पक्षप्रवेशामुळे बळकट होतो. पवार कुटुंबावरील निष्ठा व डॉ. शिंगणे यांनी शरद पवारांचा कायम ठेवलेला संपर्क यातूनच त्यांना पक्षप्रवेश व उमेदवारी मिळाली असावी, ही बाब स्पष्टपणे अधोरेखित होते, एवढे मात्र निश्चित..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »