Buldhana Vidhan Sabha Constituency : आमदारकी कुणाची जहागिरी नाही. या निवडणुकीत कुणी बंड पुकारेल तर त्याच्यावर पक्षांतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशारा आ. संजय गायकवाड यांनी दिला.
बुलढाणा : आमदारकी कुणाची जहागिरी नाही. या निवडणुकीत कुणी बंड पुकारेल तर त्याच्यावर पक्षांतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशारा आ. संजय गायकवाड यांनी दिला. आगामी विधानसभा निवडणूकीत जागा जिंकणे हाच महायुतीचा फॉर्म्यूला असल्याची माहितीही शिंदे शिवसेनेचे आ. गायकवाड यांनी दिली.
ते बुलढाणा येथील मातोश्री जनसंपर्क कार्यालयात 18 ऑक्टोबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला असून, वेगवेगळ्या पक्षातर्फे जागा वाटपाबाबत निर्णय घेणे सुरू झाले आहे. विद्यमान सरकारमधील घटक पक्ष लवकरच उमेदवारांच्या जागा वाटपाची घोषणा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या विविध ठिकाणच्या उमेदवारीकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, महायुतीसरकारतर्फे केलेल्या विकास कामांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम सुरू आहे. याअनुषंगाने बुलढाणा येथे विद्यमान आ. गायकवाड यांच्यावतीने महायुतीची पत्रकार परिषद घेण्यात आली. याप्रसंगी शिवसेना शहराध्यक्ष गजेंद्र दांदडे, भाजपा शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, भाजपचे डॉ. उबरहंडे, सुनील देशमुख, मोहन पवार, राष्ट्रवादी पक्षाच्या अनुजा सावळे यांची उपस्थिती होती.
मतदारसंघातील कामांचा मांडला लेखाजोख
पत्रकार परिषदेत आ. संजय गायकवाड यांनी अडीच वर्षात सरकारने केलेल्या विकासकामांचा अहवाल सादर करीत बुलढाणा मतदारसंघात झालेल्या कामांची माहिती दिली. दरम्यान, राज्यात महायुतीचे तगडे उमेदवार विरोधकांना आव्हान देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.