Chhatrapati Sambhajinagar News : विद्यार्थ्याचे अपंगत्व त्याच्या वैद्यकीय शिक्षणाच्या आड येत नसल्याचे स्पष्ट करत ओंकार रामचंद्र गोंड या विद्यार्थ्याला लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला.
छत्रपती संभाजीनगर : विद्यार्थ्याचे अपंगत्व त्याच्या वैद्यकीय शिक्षणाच्या आड येत नसल्याचे स्पष्ट करत ओंकार रामचंद्र गोंड या विद्यार्थ्याला लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. वैद्यकीय चाचणी मंडळाच्या अहवालाची नोंद घेत सर्वोच्च न्यायालयाचे न्या. बी. आर. गवई, न्या. अरविंदकुमार आणि न्या. के. व्ही. विश्वनाथन यांनी हा निर्वाळा केला.
ओंकार गोंड या विद्यार्थ्याला ४४ ते ४५ टक्के अपंगत्व आहे आणि ४० टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व असलेला विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी अपात्र असल्याचा नियम आहे. या नियमाला ओंकार गोंड याने अॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत आधी उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यासाठी एक जागा रिक्त ठेवण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्याचे अपंगत्व त्याच्या अभ्यासक्रमाच्या आड येऊ शकते का याची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचा आदेश दिला. त्यानुसार वैद्यकीय मंडळ स्थापन करण्यात आले व या मंडळाने ओंकार गोंड याची चाचणी घेऊन असा निष्कर्ष काढला की, त्याचे अपंगत्व त्याच्या वैद्यकीय अभ्यासक्रम शिकण्याच्या आड येऊ शकत नाही.
४० टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व असले तरी ओंकार गोंड हा वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी दावा करण्याचा आपला हक्क गमावत नाही, असा निष्कर्ष काढून त्याला वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्याचे आदेश दिले. या प्रकरणी केंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. डी. संजय आणि वरिष्ठ अधिवक्ता गौरव शर्मा यांनी काम पाहिले.