Jalna Crime News: अवैध गर्भपात प्रकरणातील फरार डॉक्टरला जामनेरमधून घेतले ताब्यात 

Akola Crime News

Jalna Crime News: भोकरदन येथील कथीत गर्भलिंग निदान करून गर्भपात करणार्‍या संशयीत डॉक्टर आरोपीच्या जालना येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या असून त्याला जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून अटक करण्यात आली.

Jalna Crime News
Jalna Crime News

विनोद काळे / जालना : भोकरदन येथील कथीत गर्भलिंग निदान करून गर्भपात करणार्‍या संशयीत डॉक्टर आरोपीच्या जालना येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या असून त्याला जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून अटक करण्यात आली. ही कारवाई गुरुवार , 22 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता करण्यात आली असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.

भोकरदन शहरातील जालना रोडवर अमर हॉस्पिटलच्या पाठीमागे एका तीन मजली इमारतीत अवैधरित्या गर्भलिंग निदान करून गर्भपात करण्यात येत असल्याची चर्चा तालुक्यात सुरू होती. याशिवाय तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध गर्भपात केंद्र चालवले जात असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. या पाश्र्वभूमीवर आरोग्य विभागाने दखल घेतली. दरम्यान, शहरातील अमर हॉस्पिटलच्या पाठीमागे एका तीन मजली इमारतीत अवैधरित्या गर्भलिंग निदान करून गर्भपात सुरू असल्याची गुप्त माहिती जिल्हा आरोग्य विभागाला मिळाली होती. त्यामुळे अत्यंत गुप्तता पाळत 6 जुलै रोजी सायंकाळी 5.30 वाजता छापा मारून कारवाई करण्यात आली होती. त्यामध्ये गर्भपाताच्या इंजेक्शन, गोळ्या आणि आधुनिक यंत्र सामुग्री आढळून आली होती. एकूण 8 लाख 91 हजार 760 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. दरम्यान, यातील मुख्य संशयीत आरोपी डॉ. दिलीपसिंग चतुरसिंग राजपूत हा फरार झाला होता. या प्रकरणी भोकदरन पोलीस ठाण्यात भोकरदन ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुनंदा काथार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तेंव्हापासून हा संशयीत आरोपी फरार होता, अखेर पळसखेडा मिराची, ता. जामनेर, जि. जळगाव येथील एका नातेवाईकाच्या शेतात दडून बसलेल्या डॉ. दिलीपसिंग चतुरसिंग राजपूत याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.
भोकरदन येथे अवैधरित्या गर्भपात होत असल्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. सरोज घोलप, डॉ. विजय वाकोडे, अ‍ॅड. सोनाली कांबळे, मनोज जाधव, अविनाश जाधव, संदीप रगडे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य, हसनाबादचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय अहिरे, दीपक सोनुने, निलेश खरात, कल्पना बोडखे, नरहरी हरदे यांनी ही कारवाई केली होती. या कारवाईत योगेश कडुबा पडोळ, रा. बाणेगाव, ता. भोकरदन, ह. मु. जिजाऊ नगर, भोकरदन, नितिन ऋषीकेश जाधव, रा. पेरजापुर, ता. भोकरदन, संध्या सुनिल आपार यांना पोलीसांनी ताब्यात घेतले होते. परंतु, या गुन्ह्यातील मुख्य संशयीत आरोपी डॉ. दिलीपसिंग चतुरसिंग राजपुत हा मात्र फरार झाला होता. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेने त्याला अटक करण्यासाठी स्वतंत्र पथक तयार केले होते. या पथकाला डॉ. संशयीत आरोपीन दोन दिवसापुर्वी देखील पोलीसांना हुलकावनी दिली होती. परंतु, स्थानिक गुन्हे शाखेने त्याच्या पळसखेडा मिराची, ता. जामनेर, जि. जळगाव येथून रात्रीच्या सुमारास अटक करुन जालना येथे आणले जात आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या सूचना

6 जुलै रोजी आरोग्य विभाग आणि पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेल्या डॉ. दिलीपसिंग राजपूत याला शोधण्यात भोकरदन पोलिसांना अपयश आले. याबाबत ‘दैनिक महाभूमि’ ने 24 जुलै रोजी ‘डॉ. दिलीप राजपूतवर कोणाचा वरदहस्त?’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. दरम्यान, या प्रकरणाची दखल घेऊन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दोन दिवसांपूर्वी यंत्रणेला सूचना दिल्या होत्या. त्यानंतर गुरुवार, 22 ऑगस्ट रोजी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »