Chhatrapati Sambhajinagar: ठाकरेंच्या उपस्थितीत संभाजीनगरात कार्यकर्ता मेळावा-अंबादास दानवे

शिवसंकल्प मेळाव्याला उपस्थित मान्यवर

Chhatrapati Sambhajinagar: शेतकऱ्यांना न्याय देणार आणि गद्दारांना गाडणार या घोषवाक्याखाली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली रविवार ७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता शहरातील बीड बायपास रोड वरील सूर्या लॉन्स येथे शिवसंकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

शिवसंकल्प मेळाव्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेला उपस्थित मान्यवर.
शिवसंकल्प मेळाव्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेला उपस्थित मान्यवर.

छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांना न्याय देणार आणि गद्दारांना गाडणार या घोषवाक्याखाली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली रविवार ७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता शहरातील बीड बायपास रोड वरील सूर्या लॉन्स येथे शिवसंकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रविवार ३० जुन रोजी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.
या मेळाव्या दरम्यान संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांना तांत्रिक, सामाजिक व राजकीय मार्गदर्शन केले जाणार आहे. पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार, प्रसार व कार्यक्रम कशा पद्धतीने घेण्यात यावे यासाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले असून, आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण व्हावा हा या मागचा उद्देश असल्याचे दानवे यांनी म्हटले.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीची जानेवारी महिन्यापासून प्रचार करण्यास सुरूवात केली होती. एकूण 105 सभा या दरम्यान त्यांनी घेतल्या होत्या. त्याचे परिणाम आपल्या सर्वांसमोर असून त्याच धरतीवर विधानसभेच्या निवडणुकीची पूर्व तयारीची सुरुवात संभाजीनगर येथून सुरुवात करण्यात येणार असल्याचे अंबादास दानवे यांनी जाहीर केले.
जिल्ह्यातील एकूण पाच हजार शिवसैनिक या मेळाव्यात सहभागी होणार आहे. मागील दोन ते अडीच वर्षात घडलेल्या घटनांना विसरून पुन्हा एकदा नव्याने जोमाने पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे यासाठी ही संकल्पना राबवण्यात येत आहे. मागील विधानसभा निवडणुकीत संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेनेने एकूण ६ विधानसभेच्या जागा जिंकल्या होत्या.परंतु दोन वर्षांपूर्वी झालेल्या बंडानंतर चित्र बदलले. त्याचा वचपा काढण्यासाठी जिल्ह्यात पुन्हा सहा जागा जिंकून आणण्यासाठी या मेळावा दरम्यान संकल्प केला जाणार असल्याची ग्वाही यावेळी दानवे यांनी दिली.
या मेळाव्याच्या नियोजनासाठी संभाजीनगर शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी व युवासेना पदाधिकारी यांच्यासमवेत दानवे यांनी आपल्या कार्यालयात रविवारी बैठक घेतली.शिवसेना सदस्य नोंदणी, नवीन मतदार नोंदणी, जुन्या मतदारांची दुरुस्ती व मतदान ओळखपत्र काढून देण्यासाठी वॉर्डनिहाय शिबिर आयोजित करण्यात यावे अशी सूचना यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांना अंबादास दानवे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »