Jalna Municipal Clerk in ACB network: मालमत्ता कराची वसुली करण्याकरिता गेलेल्या जालना महानगर पालिकेतील वसुली लिपीकास जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 30 हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली.
छत्रपती संभाजीनगर : मालमत्ता कराची वसुली करण्याकरिता गेलेल्या जालना महानगर पालिकेतील वसुली लिपीकास जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 30 हजाराची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. ही कारवाई आज 11 एप्रिल रोजी करण्यात आली.
तक्रारदार यांच्याकडे जालना महानगर पालिकेची 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2024 पर्यंतचा एक लाख 24 हजार 596 रुपयांचा मालमत्ता कर बाकी होता. हा मालमत्ता कर वसूल करण्यासाठी वसुली लिपीक उत्तम शंकरराव लाडाने (54, रा.इन्कमटॅक्स कॉलनी) गेले असताना तक्रारदाराने 5 एप्रिल रोजी 41 हजार 532 रुपयांचे धनादेश लाडाने यास दिला. तक्रारदाराने रक्कम भरल्यानंतरही शिल्लक असलेले 83 हजार रुपये तुम्ही भरु नका, त्याऐवजी मला 40 हजार रुपये द्या, मी तुमचा सर्व कर नील करुन देतो असे म्हणुन तक्रारदारास 40 हजार रुपये लाचेची मागणी केली. या रक्कमेपैकी आधी दहा हजार रुपये तक्रारदाराकडून स्वीकारले. त्यानंतर राहिलेले 30 हजाराची मागणी तक्रारदाराकडे केली. परंतु उरलेली रक्कम तक्रारदारास द्यायची नसल्याने त्यांनी जालना एसीबीकडे तक्रार केली.
तक्रारीची 10 एप्रिल रोजी पडताळणी केली असता वसुली लिपीक याने 30 हजाराच्या लाचेची मागणी केल्याचे पंचासमक्ष निष्पन्न झाले. यानंतर रचलेल्या सापळ्यात वसुली पिलीक लाडाने यांने पंचासमक्ष 30 हजार रुपयांची लाच स्वीकारले. तेव्हा एसीबीने लाडाने यास रंगेहात अटक केली. याप्रकरणी आरोपी उत्तम लाडाने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास एसीबीचे अधिकारी करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक किरण बिडवे, अंमलदार गजानन घायवट, गणेश चेके, गणेश बुजाडे, शिवाजी जमधडे, कृष्णा देठे यांनी केली.