Vanchit has also changed his candidate in Marathwada: मराठवाड्यात शिवसेनेनंतर आता वंचितनेही आपला उमेदवार बदलला आहे. परभणीमध्ये वंचितकडून हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांना उमेदवारी घोषीत केली आहे.
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील राजकारणात आता नवा ट्रेंड रुजू पाहत आहे. तो म्हणजे दिलेला उमेदवार बदलणे. यामध्ये वंचित बहुजन आघाडी हा पक्ष आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. कारण, ‘वंचित’ने आज त्यांचा तिसरा उमेदवार बदलला. तो म्हणजे परभणीमध्ये ‘वंचित’कडून हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांना उमेदवारी देण्यात आली असून, त्यांनी अर्जही दाखल केला आहे.
वंचित बहुजनाना सत्तेत वाटा मिळावा या उदात्त हेतूने ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी पक्ष कार्यरत आहे. वंचिताना मुळ राजकीय प्रवाहात आणण्याच्या अट्टाहासापोटीच वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीची साथ सोडली. तर सर्वसामान्यांना उमेदवारी देऊ केली. यामध्ये परभणी लोकसभा मतदारसंघासाठी ‘वंचित’कडून आधी बाबासाहेब उगले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, आता त्यांच्याजागी हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पंजाबराव डख यांनी गुरुवारी परभणीतून ‘वंचित’चे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरला.
तगड्या उमेदवारांचे आव्हान
परभणीत महाविकास आघाडीकडून संजय उर्फ बंडू जाधव आणि महायुतीकडून महादेव जानकर हे रिंगणात आहेत. आता पंजाबराव डख या निवडणुकीत त्यांच्यासमोर कितपत आव्हान निर्माण करु शकणार, हे पाहावे लागेल.
‘वंचित’ने आतापर्यंत बदलेले उमेदवार
वंचित बहुजन आघाडीकडून रामटेकमध्ये आधी शंकर चहांदे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, शंकर चहांदे यांनी नंतर काँग्रेसचे अपक्ष बंडखोर उमेदवार किशोर गजभिये यांना पाठिंबा जाहीर केला होता. तर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात वंचितने पूर्वी सुभाष पवार यांना रिंगणात उतरवले होते. मात्र, त्यानंतर वंचितने अचानक निर्णय बदलत अभिजित राठोड या तरुण चेहऱ्याला संधी दिली. आता परभणीतही उमेदवार बदलला.