नवी दिल्ली/ काठमांडू : नेपाळ-तिबेट सीमेवर अचानक आलेल्या पुरानंतर किमान ३२० भारतीय अजूनही बेपत्ता असून, सुमारे ४०० जण चीनच्या बाजूला अडकले आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले. नेपाळच्या महाप्रलयात आत्तापर्यंत 552 जणांचा मृत्यू झाला आहे. नेपाळ सरकारने असेही सांगितले आहे की ११७ पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. त्यापैकी ८५ पर्यटक हे भारतीय आहेत.

११७ पर्यटकांची सुटका : ३२० भारतीय अजूनही बेपत्ता
नवी दिल्ली/ काठमांडू : नेपाळ-तिबेट सीमेवर अचानक आलेल्या पुरानंतर किमान ३२० भारतीय अजूनही बेपत्ता असून, सुमारे ४०० जण चीनच्या बाजूला अडकले आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले. नेपाळच्या महाप्रलयात आत्तापर्यंत 552 जणांचा मृत्यू झाला आहे. नेपाळ सरकारने असेही सांगितले आहे की ११७ पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. त्यापैकी ८५ पर्यटक हे भारतीय आहेत.

नेपाळमध्ये आलेल्या महाप्रलयामुळे हाहाकार माजला आहे. भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्र सरकार सातत्याने दोन्ही देशांच्या अधिकार्यांच्या संपर्कात असून पूरग्रस्त भागात अडकलेल्या भारतीयांची स्थिती आणि सुरक्षिततेची माहिती घेण्यात येत आहे. हिमस्खलनामुळे तिबेट व नेपाळमध्ये बुधवारी आलेल्या महापुरामुळे एकूण 552 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे आता स्पष्ट करण्यात आले आहे. चीनमधील तिबेट सीमेलगतच्या प्रदेशात शुक्रवारी ५.१ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे तीव्र धक्का बसले आहेत. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे तिबेटच्या बाजूने असलेल्या धरणाला पुन्हा तडे जाऊन पाणी साचल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचा थेट फटका नेपाळला बसला असून, त्रिशुली नदीच्या पाणीपातळीत अचानक मोठी वाढ झाली आहे. संभाव्य धोका लक्षात घेता नेपाळ प्रशासनाने अलर्ट जारी करत त्रिशुली नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे. नैऋत्य चीनच्या सिचुआन प्रांतातील लाँगचांग शहरात या ५.१ रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झाली. या भूकंपानंतर सीमेलगतच्या डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात जमीन खचल्याचे आणि पाण्याचा प्रवाह बदलल्याची माहिती आहे.
मदतीसाठी सर्वच देशांना नेपाळचा नकार
तिबेट सीमेवरून आलेल्या पुराचा फटका नेपाळला बसला आहे. भारताने नेपाळला वैद्यकीय मदत आणि बचाव साहित्य पाठवले आहे. बऱ्याचशा देशांनी नेपाळला मदत देण्याचा मानस व्यक्त केला आहे. पण नेपाळने मदत घेण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. नेपाळचे सैन्य आणि बचाव दल या आपत्तीचा सामना करण्यास सक्षम असल्याचे बालेन शाह सरकारने म्हटले आहे. आम्हाला सध्या तरी कोणत्याही मानवी मदतीची गरज नसल्याचे नेपाळ सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पण नेपाळ सरकार आर्थिक आणि बचाव कार्याशी संबंधित मदत स्वीकारणार आहे.
भारतीयांच्या स्थितीची माहिती घेण्यावर लक्ष : जयस्वाल
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, चीनच्या बाजूला अडकलेले ९६ भारतीय नागरिक रस्त्याने सुखरूप नेपाळमध्ये पोहोचले आहेत. २१ भारतीय शुक्रवारी दुपारी नवी दिल्लीत दाखल झाले. ते एक दिवस आधी नेपाळच्या पूरग्रस्त भागातून काठमांडूला पोहोचले होते. तामिळनाडूच्या या रहिवाशांचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी राजधानीच्या विमानतळावर स्वागत केले. दरम्यान, जयशंकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक उच्चस्तरीय बैठक घेतली आणि नेपाळमधील परिस्थितीचा आढावा घेतला. बैठकीदरम्यान, बेपत्ता असलेल्या भारतीयांच्या स्थितीची माहिती घेण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. काठमांडू आणि बीजिंगमधील भारतीय राजदूतही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते.
नेपाळमध्ये पुन्हा पुराचा धोका
नेपाळमध्ये भोटेकोशी नदीच्या परिसरातील वाढत्या पाणी पातळीमुळे पुन्हा पुराचा धोका वाढल्याने सावधगिरीने शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीआरआरएमए) सांगितले की, ज्या भागात या आठवड्याच्या सुरुवातीला गंभीर पूर आला होता, तो भाग वाढत्या पाणी पातळीमुळे पुन्हा एकदा पुराच्या धोक्यात आला आहे. एनडीआरआरएमएने शोध आणि बचाव कार्यात सहभागी असलेल्यांना, तसेच विविध कारणांसाठी भोटेकोशी आणि त्रिशुली परिसरात राहणाऱ्या लोकांना अत्यंत सतर्क राहण्याचे आणि कोणताही धोका जाणवल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले आहे.

