तिरंगा रॅली काढून राज्य सरकारच्या कारभारावर ओढले ताशेरे

राज्यातील शिक्षित तरुण मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या प्रतीक्षेत असून, विविध शासकीय विभागांमधील रिक्त पदांची भरती, परीक्षांचे वेळापत्रक, रोजगाराच्या नवीन संधी आणि स्थानिक पातळीवरील उद्योगांना चालना देण्याबाबत सरकारने अधिक प्रभावी धोरण राबवावे, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील वाढत्या बेरोजगारीच्या गंभीर प्रश्नाकडे राज्य सरकार आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पाट (शरदचंद्र पवार) च्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे ‘बेरोजगार हक्क एल्गार’ तिरंगा मोटारसायकल रॅली काढण्यात आली. माजी मंत्री राजेश टोपे आणि खासदार बजरंग सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या रॅलीला मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या युवक-युवती, बेरोजगार तरुण, महिला, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
हातात राष्ट्रध्वज घेऊन आणि बेरोजगारीविरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख मार्गांवरून मोटारसायकल रॅली काढली. युवकांच्या रोजगाराच्या प्रश्नावर सरकारने ठोस पावले उचलावीत, रिक्त पदांची भरती तातडीने करावी तसेच तरुणांना रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
राज्यातील शिक्षित तरुण मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या प्रतीक्षेत असून, विविध शासकीय विभागांमधील रिक्त पदांची भरती, परीक्षांचे वेळापत्रक, रोजगाराच्या नवीन संधी आणि स्थानिक पातळीवरील उद्योगांना चालना देण्याबाबत सरकारने अधिक प्रभावी धोरण राबवावे, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. केवळ आश्वासनांवर न थांबता बेरोजगारी कमी करण्यासाठी ठोस आणि परिणामकारक उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

‘युवकांच्या हाताला काम आणि हक्काचा रोजगार मिळालाच पाहिजे’, या मागणीसाठी हा एल्गार करण्यात आला. प्रशासनाने बेरोजगार तरुणांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून तातडीने निर्णय घ्यावेत, अन्यथा आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. राष्ट्रध्वजाच्या साक्षीने झालेल्या या रॅलीत ‘बेरोजगार युवकांना न्याय मिळालाच पाहिजे’, ‘रोजगाराचा हक्क मिळालाच पाहिजे’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. युवकांच्या रोजगाराचा प्रश्न माग लागेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
युवकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष नको
या रॅलीच्या माध्यमातून राज्य सरकारच्या बेरोजगारीविषयक धोरणावर जोरदार टीका करण्यात आली. युवकांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. रोजगारनिर्मिती आणि भरती प्रक्रियेला गती देणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. तरुणांच्या न्याय्य हक्कांकडे दुर्लक्ष झाल्यास हा संघर्ष केवळ एका मोर्चापुरता मर्यादित राहणार नाही, तर आगामी काळात राज्यभर अधिक तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही देण्यात आला.
यांचा होता सहभाग
या मोर्चात माजी आ. किशोर पाटील, माजी आ. चंद्रकांत दानवे, माजी आ. संजय वाघचौरे, जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, पंकज बोराडे, प्रदेश सरचिटणीस मुश्ताक अहमद, प्रदेश सरचिटणीस प्रा. शेख सलीम, प्रदेश उपाध्यक्ष इलियास किरमाणी, प्रदेश सरचिटणीस राजेश पवार, नगरसेवक नवीन ओबेराय, शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन मुल्ला, सुधाकर दानवे, जिल्हाकार्याध्यक्ष विश्वजीत चव्हाण, शहरकार्याध्यक्ष आशिष पवार, विणाताई खरे, तालुकाध्यक्ष सूर्यकांत थोरात, प्रसन्ना पाटील, डॉ. गुलदाद पठाण, राजेश साळुंके, अय्युब खान, मुलचंद पवार, भूषण तांबे, अजिंक्य किर्जत, शेलेंद्र खन्ना, आनंद मगरे, कुलदीप शिंदे, रवींद्र वीर, लतीफ कुरेशी, अनुराधा सोनपसारे, शारदा लोहवे, भाग्यश्री आष्टेकर, आशिष इंगळे, शेख मुबार, नईम शेख, गणेश पवार, उदयसिंग तवार, लाईकउद्दीन शेख, मयूर मगरे, फारुक शेख, योगेश घुगे, शारुख शेख, तारेख पठाण, आनंद घोडके, दिग्विजय शिंदे, आश्पक शेख, आदित्य कुलकण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

