रिसोड : रिसोड-मालेगाव महामार्गावरील बिबखेड परिसरात बुधवारी सकाळी सुमारे ९.४५ वाजता प्रवासी वाहतूक करणाऱ्या प्रवासी वाहनाचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. टायर फुटल्यानंतर वाहनाने तीन ते चार पलट्या घेतल्याने एकाचा मृत्यू झाला असून १० ते १२ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.

रिसोड : रिसोड-मालेगाव महामार्गावरील बिबखेड परिसरात बुधवारी सकाळी सुमारे ९.४५ वाजता प्रवासी वाहतूक करणाऱ्या प्रवासी वाहनाचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. टायर फुटल्यानंतर वाहनाने तीन ते चार पलट्या घेतल्याने एकाचा मृत्यू झाला असून १० ते १२ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंणगाव परिसरातून रिसोडकडे येत असलेले खासगी प्रवासी वाहन प्रवाशांनी खचाखच भरलेले होते. बिबखेडजवळ अचानक वाहनाचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन तीन ते चार वेळा पलटले. अपघात होताच परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून जखमींना बाहेर काढत उपचारासाठी रुग्णालयात हलविले. या अपघातात संतोष नारायण गवळी (वय ३६, रा. नावली) यांचा जागीच मृत्यू झाला. संतोष गवळी हे पत्नी व मुलासह उपचारासाठी रिसोडकडे येत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, वाटेतच झालेल्या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातात प्रमोद शिंदे (रा. नावली) यांच्यासह अन्य प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी सौ. अनिता दीपक खरात यांना पुढील उपचारासाठी मेहकर येथे रेफर करण्यात आले असून दीपक रामभाऊ खरात यांच्यासह काही जखमींवर डॉ. आटोळे यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाहनात सुमारे १७ प्रवासी प्रवास करत असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन भरधाव वेगात होते. अपघातानंतर चालक व त्याचा सहकारी घटनास्थळावरून पसार झाल्याचे सांगितले जात असून त्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून खासगी वाहनांतून सुरू असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीचा मुद्दा या अपघातानंतर पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा वाहनांवर कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या आरटीओ व पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नियमित तपासणी व कठोर कारवाईच्या अभावामुळेच अशा दुर्घटना घडत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
नियतीने हिरावले कुंकू, बाळाचे पितृछत्र
“उठा ना… मला आणि आपल्या बाळाला असं सोडून जाऊ नका,” असा आक्रोश करत संतोष गवळी यांच्या पत्नीने पतीच्या मृतदेहाला मिठी मारत फोडलेला हंबरडा उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू आणणारा ठरला. एका क्षणात संसार उद्ध्वस्त झाला, तर चिमुकल्याच्या डोक्यावरचे पितृछत्र हरपले. हे हृदयद्रावक दृश्य पाहून घटनास्थळी उपस्थितांचे काळीज पिळवटून निघाले.


