केनवड : घरावरील झेंडा सरळ करताना लोखंडी पाईपचा उच्चदाब वीजवाहिनीशी संपर्क आल्याने विजेचा धक्का बसून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी केनवड येथे घडली. मुलाला वाचविण्यासाठी धावलेल्या आईलाही विजेचा धक्का बसून त्या जखमी झाल्या आहेत.

एकुलत्या मुलाला वाचविताना आई जखमी; केनवडमध्ये शोककळा
केनवड : घरावरील झेंडा सरळ करताना लोखंडी पाईपचा उच्चदाब वीजवाहिनीशी संपर्क आल्याने विजेचा धक्का बसून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी केनवड येथे घडली. मुलाला वाचविण्यासाठी धावलेल्या आईलाही विजेचा धक्का बसून त्या जखमी झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, केनवड येथील संकेत संतोष खराटे (वय २१) हा पुणे येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. सुट्टीसाठी तो गावी आला होता. मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यामुळे घरावरील झेंडा वाकल्याने तो सरळ करण्यासाठी संकेत लोखंडी पाईप हातात घेऊन गेला. यावेळी पाईपचा जवळून जाणाऱ्या उच्चदाब वीजवाहिनीशी संपर्क आला. त्यामुळे पाईपमध्ये विद्युतप्रवाह उतरून संकेतला जोरदार विजेचा धक्का बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटना पाहताच त्याची आई सुलोचना संतोष खराटे या मुलाला वाचविण्यासाठी धावल्या. मात्र त्यांनाही विजेचा धक्का बसून त्या जखमी झाल्या. त्यांच्यावर वाशिम येथील रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. बुधवारी शोकाकुल वातावरणात संकेतवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
क्षणात होत्याचे नव्हते
केनवड येथील प्रतिष्ठित शेतकरी संतोष रामराव खराटे यांचा मुलगा संकेत पुण्यात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. कुटुंबाच्या भविष्यातील आशा असलेल्या संकेतचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याने खराटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.