वाशिम : उद्धवसेनेत पुन्हा एकदा फुट पडण्याच्या चर्चांना उधाण आले असून सहा खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या हालचाली करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामध्ये यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांचेही नाव असल्याच्या शक्यतेमुळे वाशिम जिल्ह्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

खासदार फुटीच्या चर्चेच्या निषेधार्थ शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख बालाजी पाटील वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी पाटणी चौक परिसरात आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार संजय देशमुख यांच्या प्रतिकात्मक बॅनरला काळे फासून जोडेमारो आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी खासदार देशमुख यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली, तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणांनी परिसर दणाणून सोडला. खासदार देशमुख यांनी इतर पक्षात जाण्याचा निर्णय घेतला असल्यास त्यांनी प्रथम खासदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. जनतेने विश्वासाने निवडून दिल्यानंतर मतदारांचा विश्वासघात करू नये, अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हा संघटक गजाननराव देशमुख, जिल्हा समन्वयक डॉ. सिद्धार्थ देवळे, लोकसभा संघटक कॅप्टन प्रशांत सुर्वे, महिला जिल्हा संघटिका मंगला सरनाईक, उपजिल्हा संघटिका सुनीता गव्हाणकर, महिला तालुकाप्रमुख ज्योती खोडे, महिला शहरप्रमुख रंजनाताई पारसकर, मालेगाव तालुकाप्रमुख उद्धव पाटील गोडे, नगरपरिषद उपाध्यक्ष राजू भांदुर्गे, नगरपरिषद गटनेते गजानन दहात्रे यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.