जालना : आसाम राज्यातून तब्बल पंधरा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दोन अल्पवयीन मुली जालना रेल्वे स्थानकावर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

१५ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दोन अल्पवयीन मुलींची सुटका; प्रेमाच्या आमिषाने फूस लावल्याचा संशय, एक तरुण ताब्यात
जालना : आसाम राज्यातून तब्बल पंधरा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दोन अल्पवयीन मुली जालना रेल्वे स्थानकावर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. रेल्वेत प्रवासादरम्यान घाबरलेल्या अवस्थेत रडत असलेल्या मुलींमुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी आसाममधील एका २१ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले असून प्रेमाच्या आमिषाने मुलींना घराबाहेर काढून आणल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आसाममधील आनंदनगर परिसरातील दोन अल्पवयीन मुली अचानक बेपत्ता झाल्या होत्या. त्यांच्या कुटुंबीयांनी स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर एक तरुण आणि दोन मुली संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे काही प्रवाशांच्या लक्षात आले. मुली भयभीत अवस्थेत रडत असल्याने प्रवाशांना संशय आला आणि त्यांनी याबाबत माहिती दिली.
ही माहिती मिळताच गौरक्षक दलातील कार्यकर्त्यांनी तत्काळ हालचाली सुरू करत जालना पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर जालना रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत दोन अल्पवयीन मुलींसह राहुल मेहंदी ( वय २१, रा. आसाम ) या तरुणाला ताब्यात घेण्यात आले.

प्राथमिक चौकशीत संबंधित तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात
अडकवून मुलींना घरातून बाहेर काढल्याची माहिती समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, या प्रकरणामागे केवळ फूस लावणे आहे की मानवी तस्करीसारखे मोठे रॅकेट कार्यरत आहे, याचाही तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.
दोन्ही मुलींना बालकल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आले असून, समितीच्या निर्देशानुसार त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तर ताब्यात घेतलेल्या तरुणाची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.
या कारवाईत गौरक्षक दलातील राहुल वर्तले, रोहित जाधव, दत्ता पवार, युवराज राठोड, कैलास मांगडे, अमोल शिंदे, अमोल सावंत आणि यश गहेराव यांनी पोलिसांना सहकार्य केले. विशेष म्हणजे, सामाजिक प्रश्नांवर सक्रिय असलेले राहुल वर्तले यांनी या प्रकरणात तत्परता दाखवत पोलिस यंत्रणेला महत्त्वाची माहिती पुरवल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेनंतर जालना रेल्वे स्थानक परिसरात मोठी खळबळ उडाली असून, अल्पवयीन मुलींना लक्ष्य करणाऱ्या टोळ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.


