कोलकाता: विधानसभा निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाचा पराभव झाल्यानंतर, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी राजीनामा देण्यास नकार दिला. आम्ही निवडणूक हरलो नाही, असा ठाम पवित्रा घेत त्यांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर फेरफार, हिंसाचार आणि संस्थात्मक पक्षपाताचा आरोप केला. मी राजीनामा देणार नाही. आम्ही निवडणूक हरलो नाही, असे बॅनर्जी म्हणाल्या.

पराभवानंतर आक्रमक : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
कोलकाता: विधानसभा निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाचा पराभव झाल्यानंतर, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी राजीनामा देण्यास नकार दिला. आम्ही निवडणूक हरलो नाही, असा ठाम पवित्रा घेत त्यांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर फेरफार, हिंसाचार आणि संस्थात्मक पक्षपाताचा आरोप केला. मी राजीनामा देणार नाही. आम्ही निवडणूक हरलो नाही, असे बॅनर्जी म्हणाल्या. तसेच, आपल्या पक्षाने खरे तर नैतिक विजय मिळवला असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्या म्हणाल्या, विद्यार्थी राजकारणाच्या दिवसांपासून ते अगदी आजच्या काळापर्यंत, आपण अशी इतकी गलिच्छ आणि किळसवाणी निवडणूक कधीच पाहिली नव्हती. ही निवडणूक भाजपविरुद्धची लढत नव्हती, तर ती संपूर्ण सरकारी यंत्रणेविरुद्धची लढाई होती. विशेषतः, पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्या थेट हस्तक्षेपाविरुद्धची निवडणूक होती.
संपूर्ण ‘इंडीया’ आघाडी त्यांच्या पाठीशी : ममता बॅनर्जी
ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले की, संपूर्ण ‘इंडीया’ आघाडी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. सोनिया गांधी यांनी मला फोन केला. राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे, हेमंत सोरेन आणि तेजस्वी यादव या सर्वांनी माझ्याशी संपर्क केला. इंडिया आघाडी माझ्यासोबत असल्याचे त्यांनी मला सांगितले. अखिलेश यादव उद्या येत आहेत, असे तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले. भाजपच्या या मतांच्या लुटमारी विरोधात गप्प बसणार नाही; त्याऐवजी, या निवडणुकीतील गैरप्रकारांना न्यायालयात आव्हान देण्याचा आणि एक निर्णायक, ‘करो वा मरो’ची लढाई लढणार असल्याचा निर्धारही ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला.


