Mehkar police solve murder case that happened 3 years ago : मेहकर तालुक्यातील सुकळी येथील एक ३४ वर्षीय युवक बेपत्ता असल्याची तक्रार तीन वर्षांपूर्वी पोलिसांकडे देण्यात आली होती. पण अचानक पणे बेपत्ता झालेल्या युवकाचा त्याचवेळी खून करण्यात आला होता व त्याचा मृतदेह मेहकर मोळा रोड वरील जामगाव शिवारातील एका हॉटेलमध्ये आरोपींनी पुरला होता. आज पोलिसांनी सदर ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करून मृतदेहाचे अवशेष बाहेर काढले.

मेहकर : मेहकर तालुक्यातील सुकळी येथील एक ३४ वर्षीय युवक बेपत्ता असल्याची तक्रार तीन वर्षांपूर्वी पोलिसांकडे देण्यात आली होती. पण अचानक पणे बेपत्ता झालेल्या युवकाचा त्याचवेळी खून करण्यात आला होता व त्याचा मृतदेह मेहकर मोळा रोड वरील जामगाव शिवारातील एका हॉटेलमध्ये आरोपींनी पुरला होता. आज पोलिसांनी सदर ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करून मृतदेहाचे अवशेष बाहेर काढले.
एखाद्या हिंदी चित्रपटात शोभावी अशी ही घटना आहे. प्राप्त माहितीनुसार सुकळी येथील विनोद अश्रुबा नवले वय ३४ हा तीन वर्षांपूर्वी बेपत्ता झाल्याची तक्रार मेहकर पोलिसात करण्यात आली होती. अद्याप त्याचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले नव्हते. परंतु अचानक पणे काल विनोद नवले याचा त्यावेळीच खून करण्यात आला होता व त्याचा मृतदेह जामगाव शिवारातील एका हॉटेलच्या काउंटर खाली जमिनीत पुरण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली. आज सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जामगाव शिवारातील बाबूभाई कुरेशी यांच्या शेतातील हॉटेलच्या जागेत जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम केले असता मृतकाच्या मृतदेहाचे अवशेष सापडले. जामगाव शिवारातील बाबू भाई कुरेशी यांच्या शेतातील काही जागा भाड्याने घेऊन तेथे सचिन उगले नामक युवकाने ढाबा कम हॉटेल सुरू केले होते. त्याने सुनील जाधव यांच्याकडून काही रक्कम उसनवारीवर घेतली होती. सुनील त्याच्याकडे सतत या रकमेची मागणी करत होता. ती तो देऊ न शकल्यामुळे मला एकाचा खून करायचा आहे ,त्यासाठी तू मदत कर ,वाटल्यास पैसे देऊ नको असे जाधवने उगलेला सांगितले.सुकळी येथील सदर सुनील जाधव आणि मृतक ट्रक चालक विनोद नवले दोघे मित्र होते. तीन वर्षांपूर्वी दोघा मित्रांनी सचिन उगले याच्या हॉटेलवर जाऊन भरपूर मद्यप्राशन केले. तिथेच विनोद नवले याचा खून करून त्याचे प्रेत हॉटेलच्या काउंटर खालील जागेत पुरण्यात आले,अशी माहिती प्राप्त झाली आहे. सदर घटना होऊन तीन वर्षे पर्यंत पोलिसांनाही कोणताच सुगावा लागत नव्हता. अचानकपणे काल पोलिसांना तीन वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची माहिती मिळाली. आणि आज सकाळी जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करून मृतकाच्या मृतदेहाचे अवशेष बाहेर काढण्यात आले. फॉरेन्सिक पथकाने सदर ठिकाणी अनेक नमुने घेतले. वृत्त लिही पर्यंत पोलिसांचे संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


