अंबड : तालुक्यातील रुई येथे कौटुंबिक वादातून मुलानेच वडिलांची कुऱ्हाडीने हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अंबड तालुक्यातील रुई गावात खळबळ; अल्पवयीनासह दोघांविरुद्ध गुन्हा
अंबड : तालुक्यातील रुई येथे कौटुंबिक वादातून मुलानेच वडिलांची कुऱ्हाडीने हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत व्यक्तींचे नाव दिलीप धुराजी राजगुरू असे असून, ते बुधवार, ८ एप्रिल रोजी रात्री घरी झोपेत असताना त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. सकाळी घटना उघड झाल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली.
या प्रकरणी प्रल्हाद धुराजी राजगुरू यांच्या फिर्यादीवरून विशाल दिलीप राजगुरू व एका विधीसंघर्ष बालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत काही तासांतच मुख्य आरोपीला ताब्यात घेतले.
प्राथमिक माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी मृतांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यानंतर दुसऱ्या विवाहाच्या निर्णयावरून कुटुंबात वाद सुरू होता. मुलांचा या निर्णयाला विरोध असल्याने वाद तीव्र झाला आणि त्यातूनच ही भीषण घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.
घटनेची माहिती मिळताच तीर्थपुरी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली पवार व इतर अधिकाऱ्यांनी पंचनामा करून तपास सुरू केला. फॉरेन्सिक पथकानेही पुरावे संकलित केले आहेत.
या घटनेने रुई गाव हादरले असून, नातेसंबंधातील तणाव टोकाला गेल्यास त्याचे गंभीर परिणाम कसे होऊ शकतात, याचा प्रत्यय या घटनेतून आला आहे.


