अकोलादेव : ग्रामीण संस्कृतीचा आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या शंकरपटाच्या मैदानात रविवारी एक आगळेवेगळे दृश्य पाहायला मिळाले. अकोलादेव येथील जगदंबा माता यात्रा उत्सव आणि गुढीपाडव्यानिमित्त आयोजित भव्य जंगी शंकरपटाच्या उद्घाटन प्रसंगी माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी चक्क स्वतः शंकरपटाची गाडी (बैलजोडी) चालवत सर्वांच्या नजरा खिळवून ठेवल्या.

नेहमी राजकीय मैदानात विरोधकांना अस्मान दाखवणारे दानवे अकोलादेवच्या लाल मातीत एका कसलेल्या खेळाडूच्या भूमिकेत दिसले. डोक्यावर फेटा बांधून हातात चाबूक आणि लगाम धरून त्यांनी ज्या आत्मविश्वासाने बैलजोडी पळवली, ते पाहून उपस्थित शेतकरी आणि क्रीडाप्रेमींनी एकच जल्लोष केला. शेतकऱ्याचा मुलगा असून, मातीशी असलेली नाळ कधीच तुटत नाही, हेच जणू त्यांनी आपल्या या कृतीतून दाखवून दिले. जगदंबा माता यात्रा उत्सवानिमित्त अकोलादेव येथे या शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी तब्बल २ लाख ११ हजार रुपयांचे पहिले बक्षीस ठेवण्यात आले असून, विदर्भासह मराठवाड्यातून शेकडो नामांकित बैलजोड्या या स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत.
यावेळी दानवे यांचा आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. अशा खेळांमुळे ग्रामीण संस्कृती जिवंत राहते आणि तरुणांना खेळाची गोडी लागते, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गोविंद पंडित, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तू पंडित, माजी पंचायत समिती सदस्य दादाराव सवडे, किसन सरकार, सरपंच बबन राठोड, उपसरपंच रामेश्वर सवडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंकर सवडे, विजय परिहार, योगेश सवडे, भावराव दरेकर, रामेश्वर सवडे, पमु सवडे, किरण सवडे आदींसह गावकरी व बैलगाडा मालक शेतकरी उपस्थित होते.