अकोलादेव : जाफ्राबाद तालुक्यातील सावंगी-गोंधनखेडा शिवारात बिबट्या आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतात कामासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना बिबट्या प्रत्यक्ष दिसल्याने ग्रामस्थांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे, दरम्यान याबाबत माहिती मिळताच वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

अकोलादेव : जाफ्राबाद तालुक्यातील सावंगी-गोंधनखेडा शिवारात बिबट्या आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतात कामासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना बिबट्या प्रत्यक्ष दिसल्याने ग्रामस्थांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे, दरम्यान याबाबत माहिती मिळताच वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कुंभारझरी व पुर्णा नदी काठी ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या या परिसरात ऊस तोडणी सुरू आहे. त्यामुळे रान उजाड झाल्याने शेतकरी व ऊसतोड कामगारांना या बिबट्याचे दर्शन झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सावंगी आणि गोंधनखेडा परिसरातील शेतशिवारात शंकर शेळके, सुरेश भागिले व काही शेतकऱ्यांना बिबट्या फिरताना आढळून आला. त्यामुळे शेतात पिकांना पाणी देणे किंवा इतर कामे करणे शेतकऱ्यांसाठी जिवावर बेतणारे ठरत आहे. बिबट्या आल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने पालकांमध्ये
शाळेत जाणाऱ्या आपल्या मुलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत आहे. बिबट्याच्या वास्तव्याची माहिती स्थानिक नागरिकांनी वनविभागाला दिली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश डोमळे, वनरक्षक संभाजी हटकर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ या परिसराची पाहणी केली. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. बिबट्याच्या
पाऊलखुणा स्पष्ट दिसून येत नसल्या तरी, हा बिबट्याच असल्याचा दूजोरा वनविगाच्या पथकाकडून मिळाला आहे. वनविभागाने बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी सावंगी व गोंधनखेडा येथील ग्रामस्थांनी केली आहे. परिसरात भीतीचे सावट असल्याने जनजीवन काहीसे विस्कळीत झाले असून, बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावे, अशी आर्त हाक शेतकऱ्यांनी दिली आहे. कोणतीही जोखीम न पत्कारता शेतकऱ्यांनी आपली लहान मुले, जनावरे तसेच स्वत:ची खबरदारी घ्यावी, असे आवाहन वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
– एकटे शेतात जाणे टाळावे
सावंगी-गोधनखेडा परिसरात शक्यतो समूहाने राहावे आणि रात्रीच्या वेळी शेतात जाताना बॅटरी व गोंगाट करणारी साधने सोबत ठेवावीत. वनविभाग बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. शेतकऱ्यांनी शक्यतो शेतात एकटे जाणे टाळावे.
– योगेश डोमळे, वन परिमंडळ अधिकारी
