dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

शिक्षकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर देशी-विदेशी दारू परवान्यांची जाहिरात!

१ कोटी ३० लाख ते १ कोटी ८० लाखांपर्यंत दर खरेदीदारांसाठी विशेष सवलतीचीही ऑफर

शिक्षकांच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

छत्रपती संभाजीनगर : शिक्षकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर शैक्षणिक चर्चा, विद्यार्थ्यांची माहिती आणि शालेय उपक्रमांच्या संदेशांची देवाणघेवाण अपेक्षित असताना चक्क देशी-विदेशी दारू विक्री परवान्यांच्या खरेदी-विक्रीची जाहिरात झळकल्याने शिक्षण क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. या जाहिरातीत परवान्यांचे विविध प्रकार नमूद करून त्यांचे दर तब्बल १ कोटी ३० लाख ते १ कोटी ८० लाख रुपयांपर्यंत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षकांच्या ग्रुपचा वापर नेमका कोणत्या कारणासाठी केला जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका शिक्षक संघटनेच्या तसेच जिल्हा परिषद शिक्षकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर ही जाहिरात प्रसारित करण्यात आली. अमरावती आणि बीड जिल्ह्यांतील दारू विक्री परवान्यांची विक्री करण्यासाठी ही जाहिरात असल्याचे त्यात नमूद आहे. सीएल-२ होलसेल देशी, सीएल-३ होलसेल देशी आणि सीएल-३ होलसेल देशी व विदेशी अशा परवान्यांचे प्रकार देण्यात आले आहेत. त्यानुसार १.३० कोटी ते १.८० कोटी रुपयांपर्यंत किंमत सांगण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, व्यवहारासाठी लागणारा ट्रान्सफर खर्च खरेदीदाराने करायचा असून प्रत्यक्ष बैठकीत परवान्याची किंमत कमी केली जाईल, अशीही ऑफर जाहिरातीत देण्यात आली आहे. यासंदर्भात जाहिरात देणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधला असता, शिक्षकांच्या ओळखीचे खरेदीदार मिळत असल्याने अशा ग्रुपवर जाहिरात केल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, गंगापूरचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी यापूर्वी जिल्हा परिषद शिक्षकांच्या मुख्यालयी राहण्याबाबत, शाळेतील उपस्थितीबाबत आणि शैक्षणिक कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. शिक्षक शैक्षणिक कामापेक्षा अन्य व्यवसायांत अधिक लक्ष घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यावरून राज्यभर शिक्षक आणि आमदार बंब यांच्यात वाद निर्माण झाला होता.

आता शिक्षकांच्या ग्रुपवर कोट्यवधींच्या दारू परवाना विक्रीची जाहिरात झळकल्याने हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र, केवळ जाहिरातीच्या आधारे शिक्षकांच्या व्यावसायिक सहभागाबाबत निष्कर्ष काढता येणार नसून संबंधित जाहिरातदार आणि व्यवहाराची सत्यता तपासण्याची गरज आहे. शिक्षक संघटना आणि शिक्षण विभाग यावर काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top