बदलत्या भूमिकेमुळे जरांगे पाटील टीकेचे धनी…

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता वेगळे वळण मिळताना दिसत आहे. आरक्षणाच्या मागणीवर ‘आरपारची लढाई’ लढण्याची घोषणा करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील वारंवार बदलणाऱ्या भूमिकांमुळेच मराठा समाजातील काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढत असल्याचे चित्र आहे. आंदोलनाची दिशा, नेतृत्व आणि पुढील रणनीती यावरून आता समाजातच वेगवेगळे सूर उमटू लागले आहेत.
अंतरवली सराटी येथे उपोषण सुरू करताना जरांगे पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याची भूमिका घेतली होती. सरकारने तोडगा न काढल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला. मात्र पुढील टप्प्यात मुंबईकडे कूच करत असताना सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा झाली आणि उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी वाशी येथूनही आंदोलनाची दिशा बदलली होती. 2 सप्टेंबर 2025 रोजी हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीसह विविध मागण्यांबाबत सरकारकडून आश्वासने मिळाल्यानंतर मुंबईतील आंदोलन स्थगित करण्यात आले होते.
याच पार्श्वभूमीवर आता ‘नेमके साध्य काय झाले?’ असा सवाल मराठा आरक्षण लढ्यात सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे. एका बाजूला आंदोलन निर्णायक टप्प्यावर असल्याचे सांगितले जाते, तर दुसऱ्या बाजूला सरकारसोबतच्या चर्चेनंतर आंदोलन स्थगित केले जाते. या विसंगतीमुळे नेतृत्वाबाबत नाराजी व्यक्त करणाऱ्या कार्यकर्त्यांचीही संख्या वाढत असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, 17 सप्टेंबर रोजी मुंबईत या लढ्यातील कार्यकर्ते चंद्रकांत भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत आंदोलनात ‘दलाल’ घुसल्याचा आरोप केला. मुंबईत आंदोलन झाले की काही व्यक्तींकडून पैसे जमा केले जात असल्याचा आरोप त्यांनी वीरेंद्र पवार आणि प्रशांत सावंत यांची नावे घेवून केला. जरांगे यांच्या सहकाऱ्यांमध्ये असलेल्या ॲड. लहाने, आबा मार्कड यांच्यावरही त्यांनी टीका केली.
मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत सक्रिय असलेले विनोद पाटील यांनी समाजमाध्यमांवरील पोस्टमध्ये ‘बाराव्या वेळी जिंकलो’ असा उपहासात्मक दावा करत पुढील लढाई न्यायालयीन पातळीवर लढावी लागेल, असा सूर व्यक्त केला आहे. त्यामुळे रस्त्यावरील आंदोलनाबरोबरच न्यायालयीन लढाईलाही महत्त्व देण्याची भूमिका पुढे येत आहे.
जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांच्या विरोधात ईडीकडे तक्रार केल्याचा दावा करणाऱ्या अजय महाराज भारस्कर यांनी सुध्दा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगीत केल्याच्या निर्णयावर टिका केली आहे. त्यांनी पांडूरंक तारक, किशोर बलांडे यांची नावे घेवून सेंटिंग केल्याचा आरोप केला. मुंबईकडे कूच करणारे जरांगे फूस झाले, जरांगे अडाणी असून मराठा समाजाने चिंतन करावे असे आवाहन त्यांनी केले.
या आरोप-प्रत्यारोपांमुळे आंदोलनातील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर येऊ लागले आहेत. आंदोलनाचे नेतृत्व एका व्यक्तीभोवती केंद्रीत असावे की व्यापक आणि संस्थात्मक पद्धतीने लढा उभारावा, हा प्रश्नही आता चर्चेत आला आहे.
मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप पूर्णपणे निकाली निघालेला नसताना आंदोलनाच्या नेतृत्वातच मतभेदांचे सूर उमटणे हे आंदोलनासाठी महत्त्वाचे वळण ठरू शकते. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणारे कार्यकर्ते, चंद्रकांत भोसले यांच्यासारख्यांकडून होत असलेले आरोप आणि विनोद पाटील यांचा न्यायालयीन लढाईवर असलेला भरयाविश्वास या सर्व घडामोडींमुळे मराठा आरक्षणाच्या लढ्याची एकजूट टिकणार की नेतृत्वाच्या व रणनीतीच्या मतभेदातून आंदोलनातच नवी फूट पडणार? हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.


