Yoga festival : आंतरराष्ट्रीय योग दिनाला अवघे ७५ दिवस बाकी असताना योगाचा प्रचार प्रसार व्हावा, या दृष्टिकोनातून आयुष मंत्रालयाच्या वतीने ७ एप्रिलला योग महोत्सवाचे आयोजन लोणार येथे करण्यात आले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील नागरीकांनी सहभागी होण्याचे केंद्रिय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांचे आवाहन
बुलढाणा : आंतरराष्ट्रीय योग दिनाला अवघे ७५ दिवस बाकी असताना योगाचा प्रचार प्रसार व्हावा, या दृष्टिकोनातून आयुष मंत्रालयाच्या वतीने ७ एप्रिलला योग महोत्सवाचे आयोजन लोणार येथे करण्यात आले आहे. या योग साधनेमध्ये नागरीकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रिय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे.
योग साधना ही भारतीय संस्कृतीतील एक प्राचीन आणि महान परंपरा आहे, जी केवळ शारीरिक व्यायाम नसून शरीर, मन आणि आत्मा यांच्यातील सुसंवाद साधणारी एक जीवनशैली आहे. त्यामुळे जागतिक स्तरावरही योग साधनेचा स्वीकार केल्या जात आहे भारतीय योग साधनेला जागतिक स्तरावर पोचून भारतीय योग साधनेच्या माध्यमातून विश्वकल्याण व्हावे या दृष्टिकोनातून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला. योग महोत्सव कार्यक्रम 7 एप्रिल ला बुलढाणा जिल्हयातील जगप्रसिध्द लोणार सरोवर येथील छत्रपती शिवाजी महाराज उदयान येथे आयोजीत करण्यात आला आहे.
7 हजाराच्या अधिक योग साधक सहभागी होणार
लोणार येथील योग साधनेमध्ये 7 हजाराच्या अधिक योग साधक सहभागी होणार आहेत. या योग साधनेच्या माध्यमातुन ऐशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्या जाणार आहे. एकाच वेळी त्रिकोणासन करणाऱ्या लोकांची सर्वाधीक संख्या राहणार आहे. अशी माहिती केंद्रिय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली या योग साधनेमध्ये इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनाईझेशन योग विद्या गुरुकूल क्रीडा भारती पतंजली योग संस्थान, आर्ट ऑफ लिव्हींग, लोणार येथील महिला बचत गट, शाळकरी विद्यार्थी आयुष संस्थेतील कर्मचारी सहभागी होणार आहेत. या पत्रकार परीषदेला मुरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थान चे निदेशक डॉ.काशिनाथ समघंडी, कार्यक्रम अधिकारी डॉ.इश्वर आचार्य उपस्थित होते.


