जालना : शहरात अवैध शस्त्रे विक्री, बाळगण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. दरम्यान, सदर बाजार पोलीस ठाण्याच्या डीबी (डिटेक्शन ब्रांच) पथकाने केलेल्या कारवाईत दोन गावठी कट्टे (अग्निशस्त्रे) आणि ११ जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणातील एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

मंगळवार, ३० डिसेंबर रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात कार्यरत उपनिरीक्षक सचिन सानप यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, विक्की वीर (रा. काद्राबाद, जालना) हा बेकायदेशीर पिस्तूल बाळगून फिरत आहे. ही माहिती पोलीस निरीक्षक संदीप भारती यांना देण्यात आली. त्यांच्या आदेशानुसार डीबी पथकाने तातडीने कारवाई सुरू केली.
अलंकार टॉकीज परिसरात सापळा रचून दुपारी साडेएक वाजता विक्की वीर याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर त्याने सदर गावठी कट्टा हा शिवम राजपूत (रा. राजपूतवाडी, ता. जि. जालना) याचा असून तो सध्या विक्रम कुलथे (वय ३०, रा. राजपूतवाडी) याच्याकडे ठेवलेला असल्याची माहिती दिली.
त्यानुसार डीबी पथकाने दुपारी अडीच वाजता अपुरी पार्क, सामनगाव रोड परिसरातून विक्रम कुलथे याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्यानेही दिशाभूल करणारी उत्तरे दिली. मात्र सखोल चौकशीत त्याने दोन गावठी कट्टे व ११ जिवंत काडतूस झाडाखाली पुरून ठेवल्याची कबुली दिली. त्याच्या सांगण्यावरून सायंकाळी साडेतीन वाजता पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन दोन गावठी कट्टे व ११ जिवंत काडतूस हस्तगत केले.
या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील एक आरोपी फरार आहे. पुढील तपास उपनिरीक्षक सचिन सानप करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोधाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुंकणी आणि पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. डीबी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या यशस्वी कारवाईत सहभाग घेतला.