Arvind Deshmukh : राज्यात सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांच्या उभारणी व वाटपावरून वाद निर्माण होत असून, या विषयाला राजकीय रंग चढत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर मराठा महासंघाने शासनाकडे कडक आणि स्पष्ट नियमावली लागू करण्याची मागणी केली आहे.

मराठा महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
जालना : राज्यात सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांच्या उभारणी व वाटपावरून वाद निर्माण होत असून, या विषयाला राजकीय रंग चढत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर मराठा महासंघाने शासनाकडे कडक आणि स्पष्ट नियमावली लागू करण्याची मागणी केली आहे.
मराठा महासंघाचे राष्ट्रीय विभागीय सचिव अरविंद देशमुख, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अशोक पडुळ तसेच शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष विश्वंभर तिरुखे यांनी संयुक्त निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली आहे.
संबंधित निवेदन ई-मेल व व्हॉट्सअॅपद्वारे पाठवण्यात आले आहे. सध्या शिवजयंतीच्या निमित्ताने काही व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणावर पुतळ्यांचे वाटप सुरू आहे. बाळराजे आवरे यांच्या माध्यमातून राज्यभरात पुतळ्यांचे वितरण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बाब चर्चेत आली आहे. जरी महाराजांच्या विचारांचा प्रसार हा हेतू चांगला असला, तरी त्यामध्ये गुणवत्ता, देखभाल आणि सामाजिक परिणाम यांचा विचार होत नसल्याची खंत व्यक्त निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. महासंघाने स्पष्ट केले की, निकृष्ट दर्जाच्या फायबर किंवा प्लास्टिकच्या पुतळ्यांमुळे भविष्यात विटंबनेची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुतळे केवळ धातू किंवा पाषाणाचेच असावेत. तसेच पुतळा स्वीकारणाऱ्या संस्था किंवा व्यक्तीकडे त्याची सन्मानपूर्वक देखभाल करण्याची क्षमता आहे का, याची खातरजमा प्रशासनाने करावी.
याशिवाय, सार्वजनिक किंवा वादग्रस्त ठिकाणी पुतळे उभारल्यास सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने अशा ठिकाणी निर्बंध घालण्याची मागणी करण्यात आली आहे. मंदिर परिसर किंवा खाजगी जागेतच पुतळ्यांची स्थापना करण्याचे निकष ठरवावेत, असेही निवेदनात म्हटले आहे.
सध्या राज्यात पुतळ्यांवरून वाद आणि त्यावरून सुरू असलेले राजकारण लक्षात घेता, परिस्थिती अधिक चिघळण्यापूर्वीच शासनाने हस्तक्षेप करणे गरजेचे निवेदनात म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी जनतेच्या अस्मितेचे प्रतीक असल्याने त्यांच्या पुतळ्यांची कोणत्याही प्रकारे हेळसांड होऊ नये आणि सामाजिक सलोखा अबाधित राहावा, यासाठी गृह विभागाने तातडीने ठोस नियमावली जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मराठा महासंघाच्या प्रमुख मागण्या
» पुतळे केवळ दर्जेदार धातू किंवा पाषाणाचेच असावेत
» पुतळा स्वीकारणाऱ्यांची देखभाल करण्याची क्षमता तपासावी
» वादग्रस्त व सार्वजनिक ठिकाणी पुतळे उभारण्यास निर्बंध
» मंदिर परिसर किंवा खाजगी जागेतच स्थापना करण्याचे निकष
» पुतळ्यांच्या माध्यमातून राजकीय फायदा घेण्यावर नियंत्रण
» गृह विभागाकडून तातडीने स्पष्ट नियमावली जाहीर करावी


