जालना : ज्या शाहिरी परंपरेने महाराष्ट्राचा इतिहास घडवला, समाजमनाला जागं केलं आणि लोकशाहीच्या लढ्यात आवाज बनून उभी राहिली, त्या शाहिरीचा नवा हुंकार नुकताच जालन्यात दुमदुमून गेला. सांस्कृतिक कार्य संचालनालय, जेईएस महाविद्यालयाच्या लोककला विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शाहिरी प्रशिक्षण शिबिराच्या सांगता समारंभात नव्या दमाच्या शाहिरांनी सादर केलेल्या पोवाड्यांनी संपूर्ण सभागृह भारावून टाकले.

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक ‘गण’ सादरीकरणाने झाली. त्यानंतर शिबिरार्थी नेहा खंडागळे हिने सादर केलेल्या ‘शिवजन्माच्या’ पोवाड्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अक्षरशः डोळ्यांसमोर उभा केला. बालशाहीर स्वानंद धुमाळ आणि अजय काटे यांच्या जोशपूर्ण सादरीकरणाने शौर्य, राष्ट्रभक्ती आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण केले. या सादरीकरणातून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा वारसा नव्या पिढीकडे सुरक्षितपणे सोपवला गेल्याची प्रचिती उपस्थितांना आली.
या सोहळ्यासाठी ढोलकी सम्राट पांडुरंग घोटकर आणि शाहीर रत्न रमेश गिरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी जालना एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम बगडिया होते. शाहीर आप्पासाहेब उगले, प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री, मराठी विभागप्रमुख डॉ. यशवंत सोनूने, शाहीर रामानंद उगले, शिबिर समन्वयक प्रा. कल्याण उगले यांची विशेष उपस्थिती होती.
शाहीर रत्न रमेश गिरी यांनी, “शाहिरी हा महाराष्ट्राच्या मातीचा खरा सुगंध आहे. आजच्या पाश्चिमात्य प्रभावाच्या काळात असे उपक्रम लोककलेला नवसंजीवनी देतात,” असे सांगून शिबिराचे कौतुक केले. ढोलकी सम्राट पांडुरंग घोटकर यांनी शिबिरार्थींच्या लय, ताल आणि सादरीकरणाचे विशेष कौतुक केले. पुरुषोत्तम बगडिया यांनी लोककलेच्या संवर्धनासाठी संस्था कायम पाठिशी राहील, अशी ग्वाही दिली. यावेळी यशस्वी शिबिरार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले. शाहीर महर्षी आत्माराम पाटील यांच्या ‘प्रिय आई हिंदभूमी’ या भैरवीने सोहळ्याची सांगता झाली. सूत्रसंचालन शाहीर माधवी माळी यांनी केले. प्रा. कल्याण उगले यांनी शिबिराचा आढावा मांडला. कार्यक्रमास ज्येष्ठ कलावंत, विद्यार्थी आणि रसिक प्रेक्षकांची मोठी उपस्थिती होती.
लोककलेला नवसंजीवनी
शाहिरी हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा आत्मा आहे. आधुनिकतेच्या झगमगाटात हरवू पाहणाऱ्या लोककलेला जिवंत ठेवण्याचे काम अशा प्रशिक्षण शिबिरांमधून घडते. नव्या पिढीत शाहिरीची आवड निर्माण होणे ही आशादायक बाब आहे. हीच परंपरा पुढे नेण्याची खरी गरज आहे.
» शाहीररत्न रमेश गिरी