Lok Sabha Election 2024: छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी अधिकृत उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याहस्ते करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी अधिकृत उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीतील सर्व पक्षनेत्यांची उपस्थिती होती. आयोजित सभेत आघाडीच्या नेत्यांनी महायुतीवर जोरदार हल्ला करत एकजुटीची मशाल पेटवली.
आयोजित सभेत बोलताना माजी मंत्री अनिल पटेल म्हणाले की, आम्ही मागील पंधरा दिवसांपासून प्रचार करीत असताना विरोधी पक्षाला अजून उमेदवार मिळाला नाही. तर यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाल की, विरोधकांना यावेळी थैलीत बंद करायचे आहे. या शहरासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २१०० कोटी दिले. सेनेचा महापौर असताना दोन दिवसाआड पाणी येत होते. मात्र, काँग्रेस केलेला विकास सांगू शकत नाही. आता पाणी येत नाही, तेव्हा त्याला जबाबदार कोण ? पालकमंत्री पैठण येथे राहतात. इकडे फिरकत नाहीत. विकासापासून दूर नेणारे हे लोक आता काय मतं मागतील. ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे शिवसेनेचे ध्येय आहे. यावेळी मतदार म्हणतोय मोदी हटाव. अशा शब्दांत दानवे यांनी महायुतीर हल्ला चढविला.