Let’s make India child marriage free:बाल विवाह रोखण्याकरीता केंद्र सरकारने बालविवाह मुक्त भारत अभियान सुरू केले आहे. अस्मिता इन्स्टीट्यूट फॉर डेव्हलपमेंट या संस्थेच्या माध्यमातून ठिकठिकाणी जनजागृती केल्या जात असून, प्रशासकीय स्तरावर ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
बुलढाणा: बाल विवाह रोखण्याकरीता केंद्र सरकारने बालविवाह मुक्त भारत अभियान सुरू केले आहे. अस्मिता इन्स्टीट्यूट फॉर डेव्हलपमेंट या संस्थेच्या माध्यमातून ठिकठिकाणी जनजागृती केल्या जात असून, प्रशासकीय स्तरावर ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. गावोगावी, शाळा महाविद्यालयांमध्ये बाल विवाह रोखण्यासाठीची प्रतिज्ञा घेण्यात येत असून, ‘चला बाल विवाहमुक्त भारत घडवूया’ अशी हाक दिल्या जात आहे. या मोहिमेसंदर्भातील माहिती, अस्मिता इन्स्टीट्यूटच्या संगीता गायकवाड यांनी 28 नोव्हेंबर रोजी पत्रकार भवन येथे दिली. यावेळी समाजिक कार्यकर्त्या जिजा चांदेकर यांचीही उपस्थिती होती.
अलीकडच्या काळात बालविवाहाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. कौटुंबिक दारिद्र्य आणि मोबाईलच्या अतिवापरातून अल्पवयीन मुली बालविवाह करिता तयार होत असल्याचे निदर्शनात येते. बालविवाह करणे, यासाठी मुलामुलींना प्रवृत करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून, मुलांच्या भवितव्याचा सखोल विचार करण्यासाठी तसेच समाज मनावर दुष्परिणाम होऊ नये, याकरिता बाल विवाह मुक्त भारत घडविणे, अतिशय गरजेचे असल्याचे संगीता गायकवाड यांनी सांगितले. जिल्हा प्रशासन, महिला बाल विकास विभाग यांच्या माध्यमातून जिल्ह्यात ही मोहीम विस्तारीत स्वरूपात राबविण्यात येत असल्याचे त्यांनी संगितले.
वर्षभरात रोखले 56 बालविवाह
जिल्ह्यात 2023-24 दरम्यान, 56 बालविवाह रोखण्यात आले आहे. यामध्ये संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्यात बालविवाहाच्या अनेक घटना घडून गेल्याचे समजते आहे. बुलढाणा तालुक्यातील केळवद, गुम्मी या ठिकाणी धाड टाकून बालविवाह रोखण्यात आले आहेत.
‘बालविवाह मुक्त गाव’ घडविण्याचा ठराव
ग्रामीण भागात या घटनांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे गावागावात मशाल रॅली काढत बाल विवाह रोखण्याचा संदेश दिल्या जात आहे. तसेच ग्रामपंचायतीमध्ये बाल विवाह मुक्त गाव घडविण्याचा ठराव पारित करण्यात येत आहे.
बालविवाहाची हालचाल दिसल्यास 1098 डायल करा
बालविवाह होण्यासारख्या हालचाली दिसून आल्यास 1098 क्रमांक डायल करून प्रशासनास कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.