Jalna News : जिल्हा स्त्री रुग्णालयात एका महिलेची सुखरूप प्रसूती झाली. महिलेला कन्यारत्न प्राप्त झाले. प्रसूतीनंतर महिलेला रक्तश्राव झाल्यानंतर उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे उपचारादरम्यान महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

जालना : जिल्हा स्त्री रुग्णालयात एका महिलेची सुखरूप प्रसूती झाली. महिलेला कन्यारत्न प्राप्त झाले. प्रसूतीनंतर महिलेला रक्तश्राव झाल्यानंतर उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे उपचारादरम्यान महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवार, 4 एप्रिल रोजी रात्री उशिरा घडली. कोमल किशोर चव्हाण असे मृत महिलेचे नाव असून या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोमल चव्हाण यांना शनिवार, 4 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुपारी 12 वाजता त्यांची नॉर्मल डिलेव्हरी झाली आणि त्यांनी एका कन्यारत्नाला जन्म दिला. मात्र प्रसूतीनंतर काही वेळातच त्यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टरांनी तत्काळ उपचार सुरू केले आणि ऑपरेशनद्वारे रक्तस्त्राव नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. तरीही त्यांची प्रकृती गंभीरच राहिली. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास पुढील उपचारासाठी त्यांना उच्चस्तरीय रुग्णालयात हलवण्याची तयारी सुरू होती. मात्र नातेवाईकांच्या इच्छेनुसार त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना रात्री सुमारे 10 वाजता त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास प्रक्रिया सुरू आहे. मृत महिला मूळ बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील हनवतखेड येथील रहिवासी होती.

रक्तस्त्राव नियंत्रणासाठी प्रयत्न
“रुग्णाला प्रसूतीनंतर अचानक मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता.आमच्या वैद्यकीय पथकाने तत्काळ उपचार करत ऑपरेशनद्वारे रक्तस्त्राव नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी हलवण्याची प्रक्रिया सुरू होती. नातेवाईकांच्या निर्णयानुसार रुग्णाला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. जिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
» डॉ. सुदाम गवारे,
वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा स्त्री रुग्णालय, जालना


