छत्रपती संभाजीनगर ः स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण असले तरी त्या फक्त निवडणुका लढवण्यापुरत्याच असतात, कारभार पुरूषांनीच करायचा असतो, ही मानसिकता छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेतील काही नवनियुक्त जि.प. महिला सदस्य पतींनी दर्शवली आहे.

सतीश रेंगे / छत्रपती संभाजीनगर ः स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण असले तरी त्या फक्त निवडणुका लढवण्यापुरत्याच असतात, कारभार पुरूषांनीच करायचा असतो, ही मानसिकता छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेतील काही नवनियुक्त जि.प. महिला सदस्य पतींनी दर्शवली आहे. शुक्रवारी पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या विकास कामांच्या आढावा बैठकीत त्यांनी खुसखोरी करून आपल्या सदस्य पत्नीच्या खुर्च्या बळकावल्या अन्ा काम दाखवा म्हणत अधिकाऱ्यांच्या कारभाराची झाडाझडती घेतली. चार वर्षाच्या प्रशासकीय कारभारापुढे साडेचार तासाच्या बैठकीत अधिकाराची तलवार उपसणाऱ्या अध्यक्ष, उपाध्यक्षांनी स्वयंघोषीत जि.प. सदस्यांपुढे मात्र ती तलवार म्यान ठेवली.
मागील चार वर्षापासून जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रशासकीय कारभार सुरू होता. गेल्या आठवड्यात झालेल्या जि.प.निवडणुकीमुळे या संस्थेला लोकप्रतिनिधी मिळाले. पहिल्या टप्यात झालेल्या पदाधिकारी निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष म्हणून भाजपाच्या अविनाश गलांडे आणि जितेंद्र जैस्वाल यांनी पदभार हाती घेतला. त्यांनी लागलीच शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांच्या उपस्थितीत विविध विभागाची बैठक बोलावली. प्रशासकीय कार्यकाळात किती निधी आला, नेमकी कोणती कामे झालीत, किती कामे अपूर्ण आहेत. जिल्हा परिषदेच्या तिजोरीची काय अवस्था आहे ? असा या आढाव्याचा त्यात समावेश होता. मात्र या दरम्यान जे जि.प.सदस्य नाहीत असे काही चेहरे बैठकीत बसल्याचे पहायला मिळाले. त्यात गंगापूर तालुक्यातील सिल्लेगांव सर्कलच्या भाजपा जि.प. सदस्या सविता जाधव यांचे पती संतोष जाधव, खुल्ताबाद तालुक्यातील बाजार सावंगी सर्कलच्या भाजपा जि.प.सदस्या प्रतीक्षा कापसे यांचे पती विकास कापसे यांचा समावेश होता. संतोष जाधव यांनी यापूव जि.प. अर्थ व बांधकाम सभापती पदाची धुरा सांभाळलेली आहे. आता सर्कल आरक्षीत झाल्याने त्यांना बाहेर राहावे लागले. मात्र अधिकारी, पदाधिकाऱ्यांबरोबर बसण्याचा मोह त्यांना अवरेना झालाय का? असा प्रश्न त्यांच्या कालच्या उपस्थितीवरून उपस्थित होत आहे.
अतिरिक्त सीईओंच्या दलनात बैठक
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांच्या दालनातील सभागृहात ही बैठक झाली. पदाधिकारी आणि सदस्यांकडून ही बैठक कोणत्याही प्रोटोकॉलनुसार बोलावलेली नव्हती, सदस्यांना पूर्व सूचना किंवा अधिकृत निमंत्रण नव्हतं त्यामुळे कोणाच्या उपस्थितीवर अक्षेप घेण्याचे कारण नसल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनातील बैठकीला कोणीही उपस्थित राहू शकतो का? पक्षाची किंवा पदाधिकाऱ्यांची अंतर्गत बैठक असेल तर अक्षेपाचे कारण नाही. जि.प.च्या विविध विभगाचे विभाग प्रमुख ज्या बैठकीला उपस्थित असतील आणि प्रमुख पदाधिकारी त्यांची झाडाझडती घेत असतील, त्यांना विकास कामाबद्दल खडेबोल सुनावत असतील तर सदस्य नसलेल्या मंडळींपुढे अपमान झाल्यासारखे वाटते असे मत एका अधिकारी सूत्रांने खासगीत बोलतांना व्यक्त केले.
बैठक अधिकृत नव्हती
संबंधीत बैठक ही अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याच दालनातील सभागृहात झाली. मात्र ही बैठक सदस्यांसाठी नव्हती, त्यांनी उपस्थित राहावे अशा कोणत्याही सूचना दिलेल्या नव्हत्या. दालनाबाहेर असलेली काही मंडळी बैठकीत येऊन असली त्यावर अक्षेप घेण्यासारखे काहीही नाही.
– अविनाश गलांडे, जि.प.अध्यक्ष
