जालना : २९ वी महानगरपालिका म्हणून अस्तित्वात आलेल्या जालना शहर महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी भाजपाच्या वंदना मगरे, तर उपमहापौरपदी राजेश राऊत यांची निवड होण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

जालना : २९ वी महानगरपालिका म्हणून अस्तित्वात आलेल्या जालना शहर महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी भाजपाच्या वंदना मगरे, तर उपमहापौरपदी राजेश राऊत यांची निवड होण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. महापौर व उपमहापौर पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अंतिम दिवशी शुक्रवार, 6 फेब्रुवारी रोजी या दोघांचेच अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. दरम्यान, भाजपाचे नेते माजी आमदार कैलास गोरंट्याल, भास्कर दानवे यांनी दोघांची निवड झाल्याचे जाहीर केले. मात्र, शासनाकडून याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.
जालना शहर महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने ४१ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले असल्याने महापौर व उपमहापौर पदांवर भाजपाचाच दावा असणार, हे जवळपास निश्चित झाले होते. महापौर पदाचे आरक्षण अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी असल्यामुळे भाजपातील चार नगरसेविका इच्छुक होत्या. त्यामुळे महापौरपदासाठी कोणाची निवड होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
महापौर पदाची निवड प्रक्रिया ९ फेब्रुवारी रोजी होणार असून, त्यासाठी नामनिर्देशन अर्ज मागविण्यात आले होते. शेवटच्या दिवशी भाजपाकडून महापौरपदासाठी वंदना मगरे आणि उपमहापौरपदासाठी राजेश राऊत यांचेच अर्ज दाखल झाल्यामुळे, आता दोन्ही पदांवर बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, भाजपाचे नेते माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि महानगराध्यक्ष भास्कर दानवे यांनी दोघांचीही बिनविरोध निवड करण्यात आल्याचे जाहीर केले.
सर्वांगीण विकासाला प्राधान्य : वंदना मगरे
नामनिर्देशन अर्ज एकमेव आल्यामुळे निवड निश्चित मानली जात असताना, भाजपाच्या वतीने वंदना मगरे आणि राजेश राऊत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माध्यमांशी बोलताना वंदना मगरे म्हणाल्या,
“पक्षाने मला पहिल्या महापौरपदाची संधी दिली, त्याबद्दल मी वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांचे आभार मानते. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधान्याने काम केले जाईल.”
दरम्यान, शासनाकडून अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतरच महापौर व उपमहापौरपदावरील निवड अंतिम ठरेल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
